स्व. प्रभाकर पाटील यांना अभिवादन

| अलिबाग | प्रतिनिधी |

शेतकरी व कामगारांचे नेते, गरीबांचे कैवारी प्रभाकर पाटील यांच्या जयंती मंगळवारी (दि. 23) रोजी अलिबागमध्ये ठिकठिकाणी साजरी करण्यात आली. त्यांच्या प्रतिमेस व पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघ व स्व. प्रभाकर पाटील सांस्कृतिक कला मंचच्या वतीने प्रभाकर पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील यांच्या हस्ते प्रभाकर पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, राजाभाऊ हळदवणेकर, मधुकर प्रधान, कोकण साहित्य परिषद अलिबागचे सहकार्यवाह नंदू तळकर, माजी नगरसेवक आर.के. घरत, भाल येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीरंग घरत, सार्वजनिक वाचनालय, जिल्हा ग्रंथालयाचे ग्रंथपाल भालचंद्र वर्तक, ज्योती म्हात्रे, झेबा कुरेशी आदी मान्यवर, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नागेश कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवरांनी प्रभाकर पाटील यांच्या कार्याची माहिती देत जुन्या आठवणींना उजाळा दिला.


रायगड जिल्हा परिषदेच्या वतीनेदेखील प्रभाकर पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आवारात असलेल्या प्रभाकर पाटील यांच्या पुतळ्यास शेकापचे जिल्हा चिटणीस तथा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष ॲड. आस्वाद पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी भवन येथील कार्यालयातदेखील रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रभाकर पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी त्यांना अभिवादन करण्यात आले.

Exit mobile version