। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव तालुक्यातील आडघर गावचे राहुल सुभाष दसवते यांना अविष्कार फाऊंडेशन इंडिया महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेतर्फे समाजरत्न गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण रविवारी (दि.25) श्रीवर्धन तालुक्यातील कुलकर्णी भाई बिरादर हॉल, उपजिल्हा रुग्णालयाजवळ करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेतर्फे देण्यात आली आहे. सामाजिक युवा कार्यकर्ते दसवते यांची उपरोक्त संस्थेकडून राज्यस्तरीय समाजरत्न गौरव पुरस्कारासाठी निवड झाल्याने त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
दसवते हे समाजात सामाजिक बांधिलकी ठेवून काम करीत आहेत. एकता क्रिकेट असोसिएशनमध्ये चांगले खेळाडू तयार होण्यासाठी ते नेहमीच आपल्या असोसिएशनमधील खेळाडूंना प्रोत्साहन देतात. तसेच तालुका पत्रकार संघातर्फे दरवर्षी घेण्यात येत असलेल्या रक्तदान शिबिरात ते रक्तदान करून इतरांना रक्तदानासाठी बोलावून या शिबिरात झोकून काम करीत आहेत. तसेच समाजातील गोरगरीब जनतेला मदतीचा हात देऊन विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमात ते नेहमीच हिरीरीने सक्रिय सहभाग घेतात. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल अविष्कार या सामाजिक व शैक्षणिक सेवाभावी फाऊंडेशनने घेऊन त्यांची राज्यस्तरीय समाजरत्न गौरव पुरस्कारासाठी निवड केली आहे.