पेण | वार्ताहर |
पेण तालुक्यातील शिहू प्राथमिक आरोग्य केंद्रास जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. परिसरातील आरोग्यविषयक समस्या लक्षात घेत शेकापचे युवा नेते प्रसाद भोईर यांनी शिहू ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासनदरबारी पाठपुरावा केला आहे. त्यासाठी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करुन याबाबत मागणी केली होती.
पेण तालुक्यातील शिहू, मुंढाणी, झोतिरपाडा, बेणसे व कुहिरे या खाडीपलीकडील ग्रामपंचायती मधील एकंदरीत 20 हजार लोकसंख्या असलेल्या वस्तीकरिता अस्तित्वात असलेले गडब प्राथमिक आरोग्य केंद्र हे साधारणतः 32 किलोमीटर अंतरावर व धरमतर खाडीने पेण तालुक्यातून विभागले असल्याने शिहू बेणसे परिसरातील जनतेला आरोग्याविषयक अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मंजुरीसंबंधी महत्त्वाचा टप्पा असलेला जिल्हा परिषद स्थायी समितीची तत्त्वतः मंजुरी, स्थायी समिती सदस्या अॅड. निलीमाताई पाटील व अॅड. आस्वाद पाटील यांच्यामार्फत 20 ऑगस्टला झालेल्या जि.प.स्थायी समिती बैठकीच्या वेळी समितीसमोर सदर प्रश्नाची निकड समजावून सांगून घेण्यात आली. शिहू येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुरी व बांधकामासंबंधीचा प्रस्ताव तात्काळ राज्य शासनाला मंजुरीकरिता पाठवावा, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिले.