छोट्या व्यावसायिकांना वाळू रॉयल्टी माफीचा निर्णय

काँग्रेसचे मंत्री, नेते, पदाधिकारी यांचे आभार
चिपळूण । वार्ताहर ।

हातपाटी वाळू व्यावसायिकांबाबत ऐतिहासिक निर्णय घेऊन या व्यावसायिकांना दिलासा दिल्याबद्दल चिपळुणातील हातपाटी वाळू व्यावसायिकांनी काँग्रेसचे मंत्री, नेते आणि वरिष्ठ पदाधिकारी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी यांचे आभार मानले आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून हातपाटी वाळू व्यावसायिकांचे प्रश्‍न प्रलंबित होते. यात रॉयल्टीचा प्रमुख मुद्दा होता. यासंदर्भात चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशी ते चिपळूण दौर्‍यावर आलेले असताना सविस्तर चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी वाळू व्यावसायिकांच्या अडचणी पटोले याच्यासमोर मांडल्या होत्या. त्यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करून या अडचणी सोडवण्याचे आश्‍वासन मा. पटोले साहेबांनी दिले होते. तसेच वाळू व्यावसायिकांच्या प्रश्‍नावर यादव यांनी रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अविनाश लाड यांच्या मार्गदर्शानाखाली महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन देऊन प्रत्यक्ष चर्चाही केली होती. दरम्यान, मुंबई येथे मंत्रालयात महसूलमंत्री थोरात आणि महसूलचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत हातपाटी वाळू व्यावसायिकांसाठीची पर्यावरण दाखल्याची अट रद्द करण्याचा आणि त्यांना रॉयल्टीमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच छोट्या हातपाटी आणि डुबी पद्धतीने वाळू व्यवसाय करणार्‍या गरीब व्यावसायिकांना वाळूची रॉयल्टी माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
काँग्रेसचे मंत्री, नेते आणि पदाधिकारी यांच्यामुळे वाळू व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया कोकण खाडी पारंपारिक हातपाटी वाळू व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष अन्वर जबले यांनी व्यक्त केली. याबद्दल त्यांनी चिपळुणातील वाळू व्यावसायिकांच्या वतीने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महसूलमंत्री थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राजापूरच्या माजी आ.हुस्नबानू खलिफे, रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड आणि चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष यादव यांचे आभार मानले.

Exit mobile version