आगरदांड्यात रेती तस्करीचा पर्दाफाश

महसूल विभागाची कारवाई; चार ब्रास रेतीसाठा जेसीबीने नष्ट

| कोर्लई | प्रतिनिधी |

मुरुड तालुक्यातील आगरदांडा-खोकरी परिसरात बिनदिक्कतपणे सुरू असलेल्या अनधिकृत रेतीसाठ्याचा महसूल विभागाने पर्दाफाश केला. तहसीलदार आदेश डफळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईत विनापरवाना साठवलेला चार ब्रास रेतीचा साठा जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आला. आगरदांडा परिसरातील खाडीकिनारी रात्री-अपरात्री विनापरवाना रेतीचा साठा केला जात असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यानुसार तहसीलदार आदेश डफळ यांच्या निर्देशानुसार मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी यांनी तक्रारदारासमवेत संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी आढळलेला चार ब्रास रेतीचा साठा जेसीबीच्या साहाय्याने नष्ट करण्यात आला. दरम्यान, मुरुड तालुक्यातील खाडी व समुद्रकिनारी अनधिकृत रेती उत्खनन किंवा विनापरवाना साठा केल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महसूल विभागाने दिला आहे.

Exit mobile version