टेनिस स्पर्धेत सानियाला जेतेपद

। ओस्ट्राव्हा । वृत्तसंस्था ।
भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाने चीनच्या शुआई झांगसोबत खेळताना ओस्ट्राव्हा खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. यंदाच्या हंगामातील सानियाचे हे पहिलेचे जेतेपद ठरले. सानिया आणि शुआई या दुसर्‍या नामांकित जोडीने महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात केटलिन क्रिस्टियन आणि एरिन रूटलिफ या जोडीवर 6-3, 6-2 अशी सरळ सेटमध्ये मात केली. तिसर्‍या मानांकित क्रिस्टियन आणि रूटलिफ या जोडीला अंतिम सामन्यात फारशी झुंज देता आली नाही. सानियाचे हे कारकीर्दीतील 43 वे डब्ल्यूटीए जेतेपद ठरले. यंदाच्या मोसमात अंतिम फेरीमध्ये खेळण्याची सानियाची ही दुसरी वेळ होती. याआधी डब्ल्यूटीए 250 क्लीव्हलंड स्पर्धेत अमेरिकेच्या क्रिस्टिना मकहेलसोबत खेळताना तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

Exit mobile version