। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
गुळसुंदे येथील प्रगतशील शेतकरी मीनेश गाडगीळ यांनी त्यांच्या शेतात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेले आहेत. ज्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या तांदळाचे उत्पादन घेतले आहे. तसेच, गाडगीळ हे भातासोबतच स्टॉबेरी, ड्रॅगनफ्रुट, कलरफुल कलिंगड, मस्कमेलन, कांदा, लसुण, ज्वारी , बाजरी, शेंगदाणा व इतर रब्बी हंगामातील पिकांची लागवड करतात. या वर्षी त्यांनी सातेरी मधमाशी पालन चालु केले असुन शेतकर्यांनी आपल्या शेतात मधमाशी पालनासाठी योग्य त्या पिकांची लागवड मधाचे उत्पादन घ्यावे, असे अवाहन त्यानी केले आहे.
मधमाशी पालनाच्या अनुशंगाने गाडगीळ यांनी आवश्यक ती झाडे आपल्या शेतावरच्या बांधावर लावलेली आहेत. मधमाशीपालन केल्याने पिकांच्या परागीभवनास खुप मदत होते व शेतातील उत्पादन वाढते. त्याच प्रमाणात मधाचे उत्पादन ही शेतकर्यांना मिळते. शुद्ध मधाला बाजारात विशेष मागणी आहे. वर्षाला 15 मध एका पेटीतुन जमा झाल्यास कमीतकमी शुद्ध मधाचा दर 1 हजार प्रती कीलो पकडल्यास 15 हजार जास्तीचे उत्पादन शेतकर्याला मिळू शकेल. तसेच, पेटतील राणीमाशी पासुन नवीन राणीमाशी उत्पादीत करुन ती नवीन पेटीत भरता येते. म्हणजे योग्य प्रमाणात प्रशिक्षण घेतल्यास एका पेटी पासुन अनेक मधमाशीपालनाच्या पेट्या आपण करु शकतो. असे मीनेश गाडगीळ यांनी सांगितले आहे.