उरण पूर्व भागावर टंचाईचे सावट

। उरण । प्रतिनिधी ।

रानसई धरणाची पाणी क्षमता वाढविण्यासाठी एमआयडीसीने तयार केलेला प्रस्ताव अनेक वर्ष धुळखात पडला आहे. परिणामी, उरण पूर्व विभागातील दिघोडे परिसरातील रानसई धरणातून पावसाळ्यातील साडेतीन महिन्यात लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे येथील नागरिकांना नोव्हेंबर महिन्यापासूनच पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. उरण तालुक्यातील नागरिकांना व येथील उद्योगासाठी लागणारे पाणी एमआयडीसीच्या रानसई धरणातून पुरविले जाते. उरणकरांना दररोज 41 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र एमआयडीसीकडे केवळ 30 दशलक्ष लिटर पाणीच असल्याने दररोज दहा दशलक्ष लिटर पाणी कमी पडत असल्याने पाणी कपात केली जाते. 1960 सालच्या दरम्यान उरणमध्ये संरक्षण विभागाच्या शस्त्रागारासाठी उरणच्या पूर्व विभागातील दिघोडे परिसरात रानसई धरणाची उभारणी करण्यात आली. याच धरणातून येथील ग्रामपंचायतींनाही पाणीपुरवठा करण्यात येऊ लागला.

दरम्यान, पाण्याची मागणी वाढली तर साठवणूक क्षमता घटली. गेल्या 60 वर्षात धरणातील पाण्याची मागणी वाढली असली तरी रानसई धरणातील पाणीपुरवठा कमी कमी होत गेला. धरणाची स्थापित क्षमता दहा दशलक्ष घनमीटर असली तरी ती घटून सध्या सात दशलक्ष घनमीटरपेक्षा कमी झाली आहे. रानसई धरणाची पाणी साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी धरणाची उंची वाढवावी किंवा धरणातील गाळ काढावा, या दोन उपाययोजनांची चर्चा गेल्या 25 वर्षापासून होत आहे. धरणाच्या गाळाची पाहणी पुण्यातल्या एका संस्थेकडून करण्यात आली असून, गाळाचे प्रमाण कमी असल्याचे सांगण्यात आले आहे.

पुनर्वसनाचा प्रश्‍न कायम
रानसई धरणाच्या उभारणीसाठी ज्या शेतकरी आदिवासींच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. त्यांचे पुनर्वसन आजही झालेले नाही. त्यामुळे नव्याने धरणाची उंची वाढविण्यासाठी लागणारी जमीन संपादित करावी लागणार असली तरी त्यांच्याही पुनर्वसनाचा प्रश्‍न आहे. या संदर्भात मागील अनेक वर्ष आमसभेत हा प्रश्‍न विचारला जात असला, तरी त्यावर कोणत्याही लोकप्रतिनिधींनी दखल घेत पाठपुरावा केला नसल्याने, पाणीटंचाईची ही समस्या गंभीर होऊ लागली आहे.
Exit mobile version