शाळेचा स्लॅब कोसळून विद्यार्थिनी जखमी

शिक्षण विभागाचा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; धाकटे शहपूर येथील घटनेने पालकांमध्ये संताप


|अलिबाग |प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील धाकटे शहापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत वर्गाचा स्लॅब कोसळून आठ वर्षीय विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्याच्या घटनेने शिक्षण विभागाच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे निघाले आहेत. गुरुवार, दि. 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पालकांकडून संताप व्यक्त होत आहे.

धाकटे शहापूर येथे जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंतची शाळा आहे. या शाळेत एकूण 28 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गुरुवारी सायंकाळी विद्यार्थी वर्गात बसलेले असताना छताच्या स्लॅबचा काही भाग अचानक कोसळला. तो इयत्ता तिसरीमध्ये शिक्षण घेणाऱ्या निष्ठा केदार मोकल या आठ वर्षीय विद्यार्थिनीच्या डोक्यावर पडला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे शाळेत एकच गोंधळ उडाला. जखमी निष्ठाला तातडीने पोयनाड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिच्या डोक्याला जवळपास दहा टाके घालण्यात आले आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत मोठी जीवितहानी टळली; मात्र, शाळेच्या इमारतीच्या सुरक्षिततेबाबत आणि विद्यार्थ्यांच्या जीविताबाबत शिक्षण विभाग किती गंभीर आहे, हा संतप्त करणारा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.

वर्षभरापूर्वी डागडुजी
विशेष म्हणजे, या शाळेची वर्षभरापूर्वीच डागडुजी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. असे असतानाही वर्गाच्या स्लॅबचा भाग कोसळल्याने या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डागडुजी नेमकी कोणत्या स्वरूपाची करण्यात आली? कामाची तपासणी कोणी केली? इमारतीची सुरक्षितता प्रमाणित करण्यात आली होती का? विद्यार्थ्यांसाठी वर्ग सुरक्षित असल्याची खात्री कोणी केली? या प्रश्नांची उत्तरे शिक्षण विभागाने देण्ो आवश्यक आहे.
शिक्षणाधिकारी फोन उचलेनात!
या गंभीर घटनेची माहिती घेण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनी फोन उचलण्याची तसदी घेतली नाही. एका शाळेत विद्यार्थ्याच्या डोक्यावर स्लॅब कोसळतो, आठ वर्षांच्या चिमुकलीला डोक्याला दहा टाके घालावे लागतात आणि अशा गंभीर घटनेबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येत नाही, ही बाब संतापजनक आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रश्नांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका काय आहे, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहे.

शाळेत घडलेली घटना गंभीर आहे. याबाबतची माहिती मला सायंकाळी शाळेतील शिक्षकांनी दिली. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक असल्याने मला तातडीने घटनास्थळी जाता आले नाही. आता जखमी विद्यार्थिनीच्या घरी जाऊन तिच्या प्रकृतीची विचारपूस करणार आहे. त्यानंतरच या घटनेबाबत अधिक माहिती देऊ शकेन.

कृष्णा पिंगळा,
गटशिक्षणाधिकारी
Exit mobile version