। नेरळ । प्रतिनिधी।
नेरळ गावातील एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या 12 वर्षीय विद्यार्थिनीची छेड काढण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि.11) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. त्यानंतर पालकांनी संबंधित घटनेची तक्रार केल्यानंतर नेरळ पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे यांच्या मदतीने नेरळ पायरमाळ भागातील एका 62 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. या घटनेबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर नेरळ पोलिसांनी तात्काळ कार्यवाही केल्याने हे प्रकरण अधिक चिघळले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, नेरळ गावातील एका जिल्हा परिषद शाळेत शिकणारी विद्यार्थिनी नियमित आपल्या लहान भावासह शाळेत जात होती. एका 62 वर्षीय व्यक्तीने तिचा पाठलाग करुन तिचे जवळ येऊन “शाळा किती वाजता सुटते?” असे विचारण्याचे बहाण्याने तिचे खांदयावर हात ठेवला, त्यावेळी अल्पवयीन पिडीत तक्रारदार हिने आरोपीचा हात झटकुन आरोपीत यास “माझे जवळ येऊ नका” असे सांगितले. तरी देखील आरोपीत याने तिच्या पाठीमागे जाऊन पिडीत ही अल्पवयीन असल्याचे दिसत असताना देखील पिडीतेचा विनयभंग केला. नेरळ पोलीस ठाण्यात 62 वर्षीय आरोपी विरोधात शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस अधिकारी शिवाजी धावले यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून महिला पोलीस उप निरीक्षक पांगे यांच्याकडे तपास दिला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची गती वाढवली आणि त्यानंतर तांत्रिक तपासाद्वारे आरोपीला नेरळ गावातील पायरमाळ भागातून ताब्यात घेण्यात आले.
नेरळमध्ये शालेय विद्यार्थिनीची छेड; आरोपीला अटक
