दुर्गम भागातील शाळांना मिळणार शिक्षक

| अलिबाग | प्रतिनिधी |

शिक्षक नसल्याने जिल्ह्यातील काही प्राथमिक शाळा अडचणीत आल्या आहेत. यावर उपाय म्हणून जिल्हा परिषदेने तत्काळ 721 प्राथमिक शिक्षकांची भरतीप्रक्रिया सुरू केली आहे. सेवेत दाखल होणाऱ्या नव्या दमाच्या तरुण शिक्षकांना दुर्गम भागातील शाळा देण्यात येणार आहेत. यामुळे दुर्गम भागातील शाळांना नवसंजीवनी मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

सर्व तालुक्यांमध्ये समान शिक्षक देण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाचा आहे; परंतु पनवेल, उरण, अलिबाग या तालुक्यात विविध कारणे दाखवून शिक्षक बदली करून घेतात. त्यामुळे शहरी भाग जास्त असलेल्या तालुक्यांमध्ये जास्त तर पोलादपूर, तळा, सुधागड या दुर्गम भाग जास्त असलेल्या तालुक्यांमध्ये शिक्षक संख्या अपुरी पडते. नव्याने भरती होणाऱ्या शिक्षकांना दुर्गम तालुक्यात नियुक्त्या मिळण्याची शक्यता जास्त असून त्यांना मिळेल त्या शाळेपासून नोकरीला सुरुवात करावी लागणार आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक भरतीप्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यासाठी 721 शिक्षक मिळणार असून पात्र उमेदवारांची यादी रायगड जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्धी करण्यात आली आहे. 4 ते 6 मार्चदरम्यान उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. त्यानंतर अंतिम पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल. रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांची निवड यादी शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.

पडताळणीनंतरच पदस्थापना
पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करून संबंधित उमेदवारांना पदस्थापना देण्याबाबत कार्यवाही पूर्ण करण्याबाबत आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार रायगड जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्हा परिषद व्यवस्थापनासाठी पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी 4 ते 5 मार्चदरम्यान मराठी माध्यम आणि 6 मार्च रोजी मराठी व उर्दू माध्यमासाठी होणार आहे. अलिबाग रायगड जिल्हा परिषदेच्या शिवतीर्थ इमारतीमधील टिपणीस सभागृहात ही प्रक्रिया होणार आहे.
मराठी, उर्दूसह 721 भरती
भरती प्रक्रियेसाठी 'पवित्र प्रणाली' ही अद्ययावत प्रणाली वापरली जात आहे. कागदपत्रांच्या पडताळणीत पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे. प्राथमिक शिक्षण विभागात मराठी माध्यमासाठी 673 तर उर्दू माध्यमासाठी 48 असे एकूण 721 शिक्षक येत्या शैक्षणिक वर्षापासून उपलब्ध होणार आहेत. संबंधित उमेदवार पडताळणी कालावधित उपस्थित न राहिल्यास त्याची अनुपस्थिती राज्यस्तरावर कळवण्यात येणार आहे.
जिल्ह्यात शिक्षकांची मंजूर तर कंसात रिक्त पदे
(मराठी व उर्दू माध्यम)

अलिबाग - 492 (95), पेण - 571 (106), पनवेल - 962 (136), उरण - 242 (33), कर्जत - 794 (107), खालापूर - 425 (81), सुधागड - 362 (67), रोहा - 566 (96), माणगाव - 700 (102), महाड - 791 (143, पोलादपूर - 333 (85), म्हसळा - 307 (94), श्रीवर्धन - 275 (78), मुरुड - 243 (54), तळा - 236 (55)
एकूण - 7299 (1332)

पवित्र प्रणालीअंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. सर्व तालुक्यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न आहे. सर्वांच्या कागदपत्रांची तपासणी झाल्यावर त्यांना याच महिन्यात नियुक्त्या दिल्या जातील. त्यानंतर लगेचच त्यांना दिलेल्या शाळांवर हजर व्हावे लागेल.

पुनिता गुरव,
प्राथमिक शिक्षणाधिकारी,
रायगड जिल्हा परिषद
Exit mobile version