सीसीटीव्हीमुळे आरोपी गजाआड
। पनवेल/कळंबोली । प्रतिनिधी।
नवी मुंबईतील कळंबोली परिसरात एका माथेफिरूने हॉटेल पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील प्रसिद्ध ‘हॉटेल द्वारका’मध्ये एका तरुणाने पेट्रोल ओतून आग लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीला अवघ्या काही तासांत बेड्या ठोकल्या आहेत. ऋतिक पगारे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ऋतिक पगारे हातात पेट्रोलची बाटली घेऊन हॉटेल द्वारकामध्ये शिरला. काही कळण्याच्या आतच त्याने हॉटेलच्या परिसरात पेट्रोल ओतले आणि आग लावण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे हॉटेलमधील कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये एकच घबराट पसरली होती. सुदैवाने, आग मोठी पसरण्यापूर्वीच त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.
कळंबोली पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी (दि.26) पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास सेक्टर-5 येथील महावीर प्लाझा या इमारतीमधील ‘द्वारका हॉटेल अँड रेस्टॉरंट बार’ येथे घडली. या प्रकरणी 50 वर्षीय हॉटेल मालक रवीश शेट्टी यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी 35 वर्षीय ऋतिक रविंद्र पगारे याला ताब्यात घेतले. ऋतिक हा सेक्टर 5 येथील शिवसागर सोसायटीत राहतो. त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. घटनेनंतर आरोपी तिथून पसार झाला होता. माहिती मिळताच कळंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यात ऋतिक पगारे पेट्रोल ओतताना स्पष्टपणे दिसून आला. या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी तातडीने तपासचक्र फिरवून आरोपीला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री हॉटेलमध्ये दोन ग्राहकांमध्ये झालेल्या वादात हॉटेलमालक शेट्टी यांनी मध्यस्थी करून ही भांडणे सोडवली होती. याचा राग ऋतिक पगारे याला आता होता. याच रागातून संतापलेल्या ऋतिकने हॉटेलच्या शटरवर बाटलीतील पेट्रोल ओतून आग लावण्याचा प्रयत्न केला. ही संपुर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या घटनेमुळे हॉटेल ज्या इमारतीत आहे त्या संपूर्ण इमारतीलाही धोका निर्माण होऊ शकला असता.
