संरक्षक भिंतीमुळे प्राणहानी टळली
| म्हसळा | वार्ताहर |
जळगाव-पुणे-माणगाव-म्हसळा- दिघी या राष्ट्रीय महामार्ग (क्र. 753) वर माणगावहून म्हसळ्याकडे येत असताना 19व्या कि.मी.मध्ये घोणसे घाटातील तीव्र वळण आणि शीघ्र उताराच्या अपघातप्रवण रस्त्यावर रविवारी सकाळी 8.30 च्या सुमारास 16 चाकी अवजड ट्रक या गाडीला अपघात झाला. माणगावहून म्हसळ्याकडे येत असताना तीव्र वळण आणि शीघ्र उतारावरील धोक्याच्या वळणावर समोरून येणारी एसटी बस अंगावर आल्याने अपघात झाल्याची नोंद ट्रेलर ड्रायव्हर रोहीत लालाजी गौंड याने म्हसळा पोलिसांना दिली असून, तशी नोंद करण्यात आली आहे.
घोणसे घाट संघर्ष समितीने पाठपुरावा करून बांधलेल्या संरक्षक भिंतीमुळे प्राणहानी झाली नसल्याचे स्थानिकानी सांगितले. परंतु, चालकाच्या डोक्याला, तर क्लिनरच्या दोन्ही पोटऱ्याना दुखापती झाल्या आहेत. ट्रेलरचा डाव्या बाजूचा शो आणि बॉडी पूर्णपणे निकामी झाल्याचे चालकाने सांगितले.