| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील कडावपासून कशेळे-नेरळ राज्यमार्ग रस्त्याला जोडणाऱ्या अंजप गाव या रस्त्यावर पत्र्यांचे कुंपण घातले आहे. पेज नदीच्या अंजप भागाकडे असलेल्या रस्त्यावर जमीन विकसित केली होती आणि त्यासाठी बांधण्यात आलेले लोखंडी पत्र्याचे कुंपण धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे ते लोखंडी पत्र्याचे कुंपण तात्काळ हलविण्यात यावे, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.
तालुक्यातील अंजप ते कडाव या गावांना जोडणारा रस्ता पेज नदी येथून जातो. हा रस्ता कडाव भागातून नेरळ कशेळे रस्त्यावरील गावांमध्ये जाण्यासाठी जवळचा रस्ता समजला जातो. या रस्त्याची सुधारणा अनेक वर्षांनी झाली असून, आता हा रस्ता गुळगुळीत झाला असल्याने या रस्त्याच्या दुतर्फा जमीन विकसित करण्याचे नियोजन जमीन विकासक करू लागले आहेत. त्यात कर्जत तालुक्यताही एक नामांकित हॉटेल याच रस्त्यावर आहे. त्यामुळे या भागातील एका मोठा भूखंड विकसित करण्याचे काम सुरु आहे. मात्र, हा भूखंड विकसित करण्यासाठी संबंधित जमीन विकासक यांनी अंजप कडाव रस्त्याच्या बाजूला जवळपास पाचशे मीटर रस्त्याच्या बाजूने लोखंडी पत्रे यांचे कुंपण घालण्यात आले आहे. या कुंपणामुळे त्या ठिकाणी जमीन विकसित करताना कोणती कामे सुरु आहेत, याची कोणतीही माहिती बाहेर पडू नये यासाठी पत्रे लावली जात आहेत.
मात्र, हेच लोखंडी पत्रे आता त्या भागातील वाहनचालकांसाठी धोक्याची सूचना देत आहेत. लोखंडी पत्रे वादळी वाऱ्याने रस्त्याच्या बाजूला झुकले असून, ते वारा आल्यानंतर अचानक कोसळले तर मोठा अपघात होऊ शकतो. त्याचवेळी त्यावेळी कोणते वाहन जात असेल तर त्या वाहनाला मोठा अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने त्या लोखंडी पत्र्याच्या आड काय चालले आहे आणि तेथील रस्त्याकडे झुकलेली लोखंडी पत्रे तात्काळ हलविण्यात यावीत, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.