| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
ऑलिम्पिकमधील पदकाचं स्वप्न तुटल्यानंतर भारताचा बॉक्सर विकास कृष्णाला दुखापतीमुळे तीन महिने बॉक्सिंगपासून दूर राहावे लागणार आहे. विकासच्या खांद्याला दुखापत झाल्याने त्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्याचा उजवा खांदा ‘डिस्लोकेट’ झाल्याने ही शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात प्रसिद्ध सर्जन डॉ. दिनशॉ परदीवाला त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करणार आहेत. परदीवाला यांनी 2019 मध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राच्या खांद्यावरदेखील शस्त्रक्रिया केली आहे. यासोबतच त्यांनी जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, सायना नेहवाल यांच्यावरही शस्त्रक्रिया केली आहे. शस्त्रक्रियेनंतर तो तीन महिने बॉक्सिंग रिंगमध्ये उतरु शकणार नाही.