जगातील पहिलाच खेळाडू
| मुंबई | वृत्तसंस्था |
विजय हजारे ट्रॉफीच्या उपउपांत्य सामन्यात महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडनं विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्याने एका षटकात सात षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. भारताचा माजी स्टार फलंदाज युवराज सिंहनं 15 वर्षांपूर्वी एका षटकात सहा षटकार मारण्याचा पराक्रम केला होता.
महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्यात सोमवार क्वार्टर फायनलचा सामना खेळविण्यात आला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्रानं उत्तर प्रदेशसमोर 50 षटकांत 331 धावांचं लक्ष्य ठेवलं. महाराष्ट्राकडून ऋतुराजनं अवघ्या 159 चेंडूंत नाबाद 220 धावांची खेळी. ज्यात 10 चौकार आणि 15 षटकारांचा समावेश आहे. ऋतुराज गायकवाडचं हे मागील आठ डावांतील सहावं शतक आहे. आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्ज संघाचा महत्त्वाचा भाग आहे. 25 वर्षीय ऋतुराजचे लिस्ट-ए कारकीर्दीतील हे 13वं शतक आहे. महाराष्ट्राने उत्तर प्रदेशचा 58 धावांनी पराभव करत विजय हजारे ट्रॉफीची सेमी फायनल गाठली आहे.
शिवा सिंहच्या गोलंदाजीवर विक्रमी खेळी
महाराष्ट्राच्या डावातील 49 व्या षटकांत डावखुरा फिरकी गोलंदाज शिवा सिंह गोलंदाजी करण्यासाठी आला. ऋतुराजनं या षटकातील चार चेंडूंत सलग चार षटकार ठोकले. त्यानंतर पाचवा चेंडू नो बॉल ठरला. यावरही ऋतुराजनं उत्तुंग षटकार मारला. त्यानंतर अखेरच्या दोन्ही चेंडूंवर दोन षटकार मारून ऋतुराजनं एका षटकात सात षटकार मारण्याचा पराक्रम केला. लिस्ट ए मध्ये एका षटकात सहा षटकार मारण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा हर्शेल गिब्स आणि श्रीलंकेचा थिसारा परेराच्या नावावर आहे.
अकरावा खेळाडू
लिस्ट ए क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा गायकवाड हा 11 वा खेळाडू ठरला आहे. भारतासाठी या फॉरमॅटमध्ये सर्वात मोठी खेळी खेळण्याच्या बाबतीत गायकवाड पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने या यादीत वीरेंद्र सेहवाग (219) आणि सचिन तेंडुलकर (नाबाद 200) या दिग्गजांनाही मागे टाकले आहे. या यादीत नारायण जगदीसन, रोहित शर्मा, शिखर धवन आणि पृथ्वी शॉ त्याच्या पुढे आहेत.