जीवरक्षक, पोलीस व दामिनी पथकाची तत्पर कामगिरी
| रायगड | प्रतिनिधी |
अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर शनिवारी (दि.20)समुद्रातील भरतीच्या वेळी अडकलेल्या सात पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. जीवरक्षक, पोलीस आणि दामिनी पथकाच्या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली असून, पर्यटकांचे प्राण वाचविण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेले काही पर्यटक भरतीच्या वाढत्या पाण्यात अडकले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच जीवरक्षक आणि पोलीस यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. समन्वयाने करण्यात आलेल्या बचावकार्यात सर्व पर्यटकांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणण्यात आले.
या बचाव मोहिमेत पर्यटक नूर मोहम्मद परवेझ मेमन, रायन उनोस मेमन, अकीफ शेख, नदीम शेख आणि गफ्फार बुबेरे यांच्यासह एकूण सात जणांना वाचविण्यात आले. बचावकार्यात जीवरक्षक कुणाल सारंग आणि प्रथमेश सारंग यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच बीट मार्शल पोलीस शिपाई कणसे आणि शिंदे, दामिनी पथकातील कर्मचारी, महिला पोलीस शिपाई घवाळे, तसेच होमगार्ड सिद्धेश नाईक आणि अमरनाथ पाल यांनी धाडस व तत्परता दाखवत बचावकार्य यशस्वी केले.
