पाली शहराचे सांडपाणी अंबा नदीत; पालीकरांचे आरोग्य धोक्यात

नागरिकांच्या जीवाशी खेळ
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
पाली शहराला येथील अंबा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. पावसामुळे अंबा नदीचे पाणी गढूळ व चिखलयुक्त झाले आहे. तसेच शहरातील सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट अंबा नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे हे प्रदूषित पाणी पिणारे नागरिक व भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ कधी थांबणार, असा सवाल उपस्थित केला जातोय.

येथील सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा कोणताच प्रकल्प पालीत उपलब्ध नाही. तसेच तब्बल 27 कोटींची शुद्धपाणी योजना देखील लालफितीत अडकलेली आहे. परिणामी, भाविक व नागरिकांना नाईलाजाने हे प्रदूषित पाणी वापरावे लागत आहे. आत्तापर्यंत नळाच्या पाण्यातून साप, बेडूक, शंखशिंपले व मासे आदी प्राणी आले आहेत. याबरोबरच शेवाळ, चिखल हे नेहमीच येत असते. आजूबाजूच्या कारखान्यांतून प्रदूषित पाणीदेखील अंबा नदीमध्ये सोडले जाते. असे प्रदूषित व घाण पाणी नाईलाजाने लोकांना वापरावे लागते आहे. अनेक नागरिक प्रदूषित पाणी पिण्यापेक्षा कूपनलिका व विहिरीचे पाणी पिण्यावर भर देत आहेत. बहुतांश जण विकतचे बाटलीबंद पाणी पितात. नियमित पाणीपट्टी भरूनदेखील लोकांना असे प्रदूषित पाणी मिळत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाने प्रदूषित पाण्यापासून आमची सुटका करावी, असा सूर नागरिकांमधून उमटत आहे.

कोटींची मंजूर शुद्धपाणी योजना कार्यान्वित करण्यात कोणत्याच अडचणी नसताना यासाठी थांबून काय फायदा आहे. याबाबत विनाकारण कोणीही राजकारण न करता पालीकरांचा विचार करून शुद्धपाणी योजना लागलीच कार्यान्वित करावी.

आश्‍वासनांचे काय?
नुकतेच पाली ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये झाले आहे. शिवाय नगरपंचायत निवडणूक प्रचारात सर्वच पक्षाचे नेते तसेच स्थानिक मंत्री, आमदार व खासदारांनीदेखील पाली शुद्धपाणी योजना कार्यान्वित करू असे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे ही आश्‍वासने नक्की प्रत्यक्षात केव्हा उतरणार या आशेवर पालीकर नागरिक आहेत.

शुद्ध नळपाणी योजना लालफितीत
शासनाने केलेल्या 2008-09 च्या सर्व्हेनुसार, पालीची लोकसंख्या व पालीत दररोज येणार्‍या भाविक व पर्यटकांच्या संख्येनुसार शुद्ध नळपाणी पुरवठा योजनेचे नियोजन केले होते. एकूण 7 कोटी 79 लाखांचा निधी व 10 टक्के लोकवर्गणीद्वारा नळयोजना उभी राहणार होती. परंतु, राजकीय श्रेयवादामध्ये ही योजना रखडली गेली. त्याबरोबर 10 टक्के लोकवर्गणीचा प्रश्‍नदेखील होता. मात्र पालीला ङ्गफबफफ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला आहे. तसेच शुद्ध नळपाणी पुरवठा योजनेसाठी 11 कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लोकवर्गणीची अट शिथील करण्यात आली आहे. सद्यःस्थितीत ही योजना 27 कोटींवर गेली आहे.

Exit mobile version