85 कोटींचा प्रस्तावित प्रकल्प; नगरविकास विभागाकडे पाठविला प्रस्ताव
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
तांत्रिक अडचणीमुळे रखडलल्या शहरातील भुमीगत गटारांचा प्रकल्प नव्याने लवकरच उभारला जाणार आहे. अलिबाग नगरपरिषदेच्यावतीने 85 कोटी रुपयांचा प्रकल्पाला मान्यता मिळावी, यासाठी नगरपालिकेने सरकारकडे याबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे. प्रस्तावाला सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शहरातील सांडपाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.
अलिबाग शहर हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरत असताना शहराचा विस्तारदेखील वाढत आहे. शहराची लोकसंख्यादेखील वाढू लागली आहे. शहरातील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अलिबाग नगरपरिषदेच्यावतीने शहरामध्ये भूमिगत गटाराचा प्रकल्प यापूर्वी राबविण्याची प्रक्रिया सुरु होती. परंतु, तांत्रिक अडचणीमुळे हा प्रकल्प होऊ शकला नाही. मात्र, पुन्हा भूमिगत गटार उभारणीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. राज्य सरकारच्या नगरोत्थान योजनेंतर्गत हा प्रकल्प नव्याने उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे तांत्रिक मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला मान्यता देण्यात आली असून, प्रशासकीय मान्यतेसाठी नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे अलिबाग शहरामध्ये नव्याने भूमिगत गटाराचा प्रकल्प उभा राहणार आहे. या प्रकल्पामुळे शहरातील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
अलिबाग शहराची भौगोलिक रचना बशी सारखी आहे. खोदाई केल्यावर पाणी लागते. त्यामुळे हा प्रकल्प आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केला जाणार आहे. राज्यात पहिल्यांदाच नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून या प्रकल्पाचे काम केले जाणार आहे. कमीत कमी उत्खनन असणार आहे. टेक्नॉलॉजीमार्फत भुयारी गटारासाठी नवीन प्रयोग राबविला जाणार असल्याची माहिती नगरपरिषदेकडून देण्यात आली.
अलिबाग शहरामध्ये भूमीगत गटाराच्या प्रकल्पासाठी नव्याने प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. शासनाकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
प्रशांत नाईक, माजी नगराध्यक्ष
अलिबाग शहरात भुयारी गटार प्रकल्पाचे काम लवकरच केले जाणार आहे. राज्य सरकारच्या नगरोत्थान योजनेतून हे काम केले जाणार असून प्रशासकिय मान्यतेसाठी सरकारडे प्रस्ताव पाठविले आहे. हॉरिझेंटल डायरेक्शनल ड्रिलींग या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून भूमिगत गटाराचे काम केले जाणार आहे.
अंगाई साळुंखे, मुख्याधिकारी तथा प्रशासक
