म्हसळ्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

। म्हसळा । प्रतिनिधी ।

म्हसळ्यात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मैत्रीच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींच्या अटकेची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती आरोपी क्रमांक एकाला माहिती असतानाही त्याने मैत्री वाढवून लग्नाचे आमिष दाखविल्याचा आणि त्यानंतर तिच्यावर वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील आरोपी क्रमांक दोन यानेही पीडित मुलीशी गैरवर्तन करून तिच्या अंगाला चुकीच्या हेतूने स्पर्श केल्याचा तसेच आरोपी क्रमांक एकला या कृत्यास प्रोत्साहन दिल्याचा आरोप पोलिसांच्या तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणातील घटनाक्रम म्हसळा परिसरातील विविध ठिकाणी घडल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद करण्यात आले आहे. पीडित मुलीने सोमवारी (दि.24) म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास गुन्हा नोंदविण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. आरोपी क्रमांक एकची ओळख रहमान अशी असून त्याचे पूर्ण नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही तर दुसरा आरोपी मोमोज शॉपशी संबंधित असल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे. दोन्ही आरोपींच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास गांभीर्याने सुरू असून, पोलिसांकडून आवश्यक पुरावे, जबाब आणि इतर तपासाची कार्यवाही केली जात आहे.

Exit mobile version