। पालघर । प्रतिनिधी ।
स्कायवॉकवर अश्लिल चाळे करणार्या प्रेमी जोडप्यांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळणार्या एका तोतया पोलिसाला माणिकपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राहुल मोरे (40) असे या आरोपीचे नाव आहे. त्याने एका जोडप्याकडून तब्बल साडेतीन लाख रुपये उकळले होते. हा तोतया पोलीस वसई-विरार महापालिकेच्या आरोग्य विभागात लिपिक म्हणून काम करत होता. मात्र, गैरव्यवहारामुळे त्याला निलंबित करण्यात आले होते.
वसई स्थानकाला लागून असलेल्या स्कायवॉकवर रात्रीच्या अंधारात अशा प्रेमी युगुलांची गर्दी असते. विरारमध्ये राहणारे 48 वर्षीय पीडीत आपल्या मैत्रीणीसह या स्काययवॉकवर आले होते. यावेळी तोतया पोलीस राहुल मोरे याने त्यांना हटकले व आपले नाव पीएसआय जगताप असल्याचे सांगितले. त्याने पीडीतांचा फोन नंबर घेतला आणि हा प्रकार घरी सांगण्याची धमकी दिली. यामुळे ते घाबरले होते. या प्रकरणाची वाच्यता न करण्यासाठी त्याने तक्रारदारांकडून 50 हजार रुपये घेतले. त्यानंतर सतत ब्लॅकमेल करत पैसे उकळत दोन महिन्याच्या काळात त्याने पीडीताकडून तब्बल 3 लाख 60 हजार रुपये उकळले होते.