शरद पवारांची मोठी घोषणा; राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष कोण?

। मुंबई । प्रतिनिधी ।
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय जीवनाबाबत मोठी घोषणा केली आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे, असं शरद पवारांनी जाहीर केले आहे. ते मंगळवारी (दि.2) मुंबईत ङ्गलोक माझे सांगातीफ या त्यांच्या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते.

शरद पवार म्हणाले, 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, तेव्हापासून गेली 24 वर्षे राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. सार्वजनिक जीवनातील 1 मे 1960 पासून सुरू झालेला हा संपुर्ण प्रवास गेली 63 वर्षे अविरत चालू आहे. त्यापैकी 56 वर्षे मी कुठल्या ना कुठल्या सभागृहाचा सदस्य किंवा मंत्री म्हणून सातत्याने काम करत आहे. संसदेतील राज्यसभा सदस्यपदाची पुढील 3 वर्षे शिल्लक आहेत. या काळात राज्याच्या आणि देशाच्या प्रश्‍नांमध्ये अधिकाधीक लक्ष घालण्यावर माझा भर असेल, याशिवाय मी कोणतीही अन्य जबाबदारी घेणार नाही.

तथापि शिक्षण, शेती, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अधिक काम करण्याचा माझा मानस आहे. तसेच युवक, युवती व विद्यार्थी यांच्या संघटनांकडे आणि कामगार, दलित, आदिवासी व समाजातील इतर कमकूवत घटकांच्या प्रश्‍नांकडे माझे लक्ष राहिल, असं शरद पवार यांनी जाहीर केलं.

शरद पवार पुढे म्हणाले, आपणास माहिती आहे की, माझा अनेक स्वयंसेवी संस्थांच्या कामकाजामध्ये सहभाग आहे. रयत शिक्षण संस्था (सातारा), विद्या प्रतिष्ठान (बारामती), मराठा मंदीर (मुंबई), महात्मा गांधी सर्वोदय संघ ( उरळी कांचन,पुणे), शिवनगर विद्या प्रसारक मंडळ (बारामती), अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद (पुणे) या संस्थांमधून साडेचार लाखाहून अधिक विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेतात. तसेच मुंबई शहरामध्ये वैज्ञानिक क्षेत्राला प्रोत्साहित करणारे नेहरू सेंटर, महाराष्ट्राच्या प्रश्‍नांसंबंधी अभ्यास करणारे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, वाचन संस्कृतीला प्रोत्साहित करणारी, काही लाख ग्रंथांचे संवर्धन करणारी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय संस्था, पुणे जिल्ह्यातील मांजरी बु. येथील ऊस व साखरकारखानदारी क्षेत्रात संशोधन- विस्तार कार्य करणारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यासारख्या अनेक संस्थांची मी जबाबदारी सांभाळत आहे व माझे योगदान देत आहे. या कार्यावर यापुढे मी अधिक लक्ष देणार आहे.

अध्यक्षपदाच्या निवडीसाठी समिती गठीत
गेल्या 60 वर्षांत महाराष्ट्राने व आपण सर्वांनी मला खंबीर साथ व प्रेम दिले, हे मी विसरू शकत नाही. परंतू यापुढे पक्ष संघटनेच्या संदर्भात पुढील दिशा ठरवणे आवश्यक वाटते. रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सदस्यांची एक समिती गठीत करावी असे मी सुचवू इच्छितो, असं शरद पवारांनी नमूद केलं.

ही समिती घेणार निर्णय
प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी.सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड. इतर सदस्य : फौजिया खान, (अध्यक्षा, राष्ट्रवादी महिला काँग्रेस), धीरज शर्मा, (अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस), सोनिया दूहन, (अध्यक्षा, राष्ट्रवादी युवती काँग्रेस आणि अध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस). ही समिती अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेईल आणि पक्ष संघटना वाढीसाठी, पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोचवण्यासाठी, जनसेवेसाठी सातत्याने झटत राहिल असा मी विश्‍वास व्यक्त करतो, असंही शरद पवारांनी नमूद केलं.

Exit mobile version