| वाघ्रण | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी अलिबाग तालुक्यातील नारंगी येथे सोमवारी (दि.13) शेकापचे ज्येष्ठ व झुंजार कार्यकर्ते नरहरी दशरथ म्हात्रे यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. वन विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी तथा सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे नरहरी म्हात्रे यांचे रविवारी (दि.12) अल्पशा आजाराने निधन झाले. निधनासमयी ते 78 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर श्रीक्षेत्र भुवनेश्वर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक तसेच वन विभागातील अधिकारी-कर्मचारी, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे उत्तरकार्य दि.23 जुलै रोजी श्रीक्षेत्र भुवनेश्वर येथे होणार असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. निधनाची बातमी समजताच चित्रलेखा पाटील यांच्यासह अनिल गोमा पाटील, अभिजित पाटील, सत्यविजय पाटील, अनिल धुमाळ,अभिषेक पाटील, कौशिक पाटील, अमोल पाटील, अथर्व पाटील व शेकापच्या अन्य कार्यकर्त्यांसह नारंगी येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी म्हात्रे कुटुंबियांचे सांत्वन करत नरहरी म्हात्रे यांनी शेतकरी कामगार पक्ष आणि समाजकारणासाठी दिलेल्या योगदानाला उजाळा दिला. तसेच, शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने माजी उपसभापती अनिल गोमा पाटील यांनी नरहरी म्हात्रे यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कार्याचा गौरव करणारा श्रद्धांजली ठराव मांडला.
शेकाप कार्यकर्ते नरहरी म्हात्रे यांचे निधन
