ठेकेदारासह प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; नातेवाईकांना आर्थिक मदत व पर्यायी रस्त्याची मागणी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
बेलकडे-कुरुळ रस्त्याच्या कामातील नियोजनशून्य कारभाराने एका दोन वर्षांच्या चिमुकल्याचा बळी घेतला. पर्यायी रस्त्याची व्यवस्था न करता सुरू केलेल्या कामामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत आरांश ठाकूर या बालकाला वेळेत उपचार मिळू शकले नाहीत आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृत्यूला ठेकेदार आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा जबाबदार असून, संबंधितांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी आक्रमक मागणी शेकापचे तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी केली आहे. बालकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी आणि तातडीने पर्यायी रस्त्याची व्यवस्था करावी; अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
अलिबाग-रोहा मार्गावरील बेलकडे ते कुरुळदरम्यानच्या अपूर्ण रस्त्याचे काम एमएसआयडीसीमार्फत सुरू आहे. दिवाळीपूर्वी काम हाती घेण्यात आले. मात्र, दिवाळीनंतर प्रत्यक्ष काम सुरू करण्याच्या सूचना वाहतूक विभागाने संबंधित ठेकेदाराला दिल्या होत्या. असे असतानाही ठेकेदाराने पोलिसांच्या सूचनांना केराची टोपली दाखवत ऐन दिवाळीच्या हंगामात काम सुरू केले. पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्याबाबत प्रशासन आणि ठेकेदार उदासीन राहिल्याने या मार्गावरील वाहतुकीचा बोजवारा उडाला.
गेल्या चार दिवसांपासून शाळा, महाविद्यालये, नोकरी-व्यवसायासाठी जाणारे नागरिक आणि विद्यार्थ्यांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सोमवारी दुपारी बामणगावमधील खारीकपाडा येथील दोन वर्षांचा आरांश ठाकूर हा बालक या कोंडीत अडकला. रुग्णालयात वेळेत पोहोचता न आल्याने त्याला योग्य उपचार मिळू शकले नाहीत. अखेर या चिमुकल्याचा मृत्यू झाला. एका निष्पाप बालकाचा जीव गेल्यानंतरही प्रशासनाला जाग येणार नाही का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
या घटनेला ठेकेदार आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा व नियोजनशून्य कारभार जबाबदार आहे. त्यामुळे संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून बालकाच्या नातेवाईकांना प्रशासन आणि ठेकेदाराने आर्थिक मदत द्यावी. भविष्यात वाहतूक कोंडीमुळे अशा घटना घडू नयेत, यासाठी तातडीने पर्यायी रस्त्याची व्यवस्था करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सुरेश घरत यांनी दिला आहे.






