| चिरनेर | वार्ताहर |
उरण तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच व सदस्य पदाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी नऊ वाजल्यापासून सुरुवात झाली. बोकडविरा येथील कौशल्य विकास केंद्र येथील पहिल्या मजल्यावरील सभागृहात मतमोजणी सुरू आहे. यात चिर्ले गावाच्या शैक्षणिक व आरोग्यासाठी झपाटलेले चिरले ग्रामपंचायतीचे शेकाप शिवसेना आघाडीचे उमेदवार सुधाकर तथा काका पाटील हे थेट सरपंच पदासाठी विजयी झाले आहेत.
धुतूम ग्रामपंचायतीच्या काँग्रेसच्या थेट सरपंच पदाच्या उमेदवार सुचित्रा प्रेमनाथ ठाकूर या थेट सरपंच पदासाठी विजयी झाल्या आहेत. तर त्यांचे पती प्रेमनाथ ठाकूर हे देखील सदस्य पदासाठी विजयी झाले आहेत. तर कळंबुसरे ग्रामपंचायतीच्या शिवसेना काँग्रेस युतीच्या उर्मिला निनाद नाईक यादेखील थेट सरपंच पदासाठी निवडून आल्या आहेत.
दरम्यान मतमोजणी केंद्रावर मतमोजणी सुरळीत रित्या पार पडावी, यासाठी शेवा बंदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर यांच्या अधिपत्याखाली तीन पोलीस निरीक्षक, 22 सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, शंभर पोलीस अंमलदारांसह पोलीस कर्मचारी व राखीव पोलीस दल एक तुकडी असा मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. अशी माहिती उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी यावेळी दिली.