। रेवदंडा । प्रतिनिधी ।
पश्चिम महाराष्ट्रातील मेंढपाळ चारा-पाण्यासाठी कोकणात दाखल झाले आहेत. पुुढील सहामहिने कोकणात मुक्काम करून पुन्हा आलेल्या मार्गी आपल्या मुळ गावी प्रस्थान करतील. सध्या अलिबाग तालुक्यातील माळरानांवर आपले बिर्हाड घेऊन भटकंती करताना मेंढपाल दिसून येत आहेत. तर, शेतकर्यांकडून त्यांना काही पैसे देऊन शेळ्या व मेंढ्या आपल्या शेतात बसविल्या जात आहेत. तसेच, मेंढ्यांची लोकर विकून हातामध्ये चांगले पैसे येत असल्याचे देखील मेंढपालांकडून सांगण्यात येत आहे.
पुणे-सातार्यातील काही दुष्काळग्रस्त भागातून अनेक मेंढपाल नोव्हेंबरच्या सुमारास, दिवाळीनंतर रायगड जिल्ह्यात दाखल होत असतात. यंदाही अलिबाग तालुक्यातील बेलकडे ते वावे पट्ट्यातील गावांमधील मोकळ्या रानमाळावर मोठ्या प्रमाणात मेंढपाल दाखल झाले आहेत. त्यांच्या शेळ्या-मेंढ्यांना येथील माळरानावर मुबलब असा चारा-पाणी मिळत आहे. सध्या अलिबाग तालुक्यात दहा ते बारा मेंढपाल आले असून ते वेगवेगळ्या गावांत आपल्या मेंढ्या चारत आहेत. अक्षय तृतीयेनंतर परतीच्या प्रवासात ते पुन्हा एकत्रीत येणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
तसेच, एक मेंढी सरासरी चार ते पाच हजारात खासगी बाजारात विकली जाते. शिवाय दिडशे ते दोनशे मेंढ्या बाळगताना 25 ते 30 किलो लोकर विक्री होत असल्याचे मेंढपालांकडून सांगितले जाते. शिवाय शेतकर्यांच्या शेतात मेंढ्या रात्रभर बसविल्यावर खर्ची म्हणून 125 रुपये अथवा चार ते पाच पायली तांदुळ दिले जातात. मेंढ्यांना रात्रीचे विशेष कवच म्हणून दिमतीला चार ते पाच तगडी कुत्रीही पाळली जातात. एका गावातून दुसर्या गावात संसार वाहून नेण्यासाठी घोड्यांचाही वापर केला जात असल्याचे या मेंढपालांकडून सांगण्यात येत आहे.
घाटमाथ्यावरील दुष्काळी भागात पाणी नसल्यामुळे शेती करता येत नाही. त्यामुळे कुटूंबाच्या उदरनिर्वाह करण्यासाठी कोकणात यावे लागते. तसेच, मेंढपालाचा जोड व्यवसाय देखील फायदेशीर पडतो.
दत्ता शंकर भायगुडे,
मेंढपाल, सातारा