| नवीन पनवेल | वार्ताहर |
भरधाव वेगात दुचाकी चालवताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याकडेच्या आंब्याच्या झाडावर धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. किरण लाला बोरसे (24) असे त्याचे नाव असून तो पनवेलमधील विहिघर येथे राहत होता. याप्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी या अपघाताला दुचाकीस्वाराला जबाबदार धरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. किरण हा दि.28 डिसेंबर रोजी पहाटेच्या वेळी त्याच्या दुचाकीने पनवेल-माथेरान रोडने आपल्या घरी जात होता. यावेळी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने किरणची दुचाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या आंब्याच्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातात किरण गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे त्याच मृत्यू झाला. याप्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून या अपघाताचा तपास केला असता किरण याने भरधाव वेगात मोटारसायकल चालवल्याने हा अपघात झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.