उपनगराध्यक्ष अनिकेत पानसरे प्रभारी नगराध्यक्ष; तटकरे-गोगावले संघर्षात तटकरेंची बाजी
| म्हसळा | प्रतिनिधी |
म्हसळा नगरपंचायतीत आधी सात नगरसेवक अपात्र ठरल्याने राज्याचे मंत्री भरत गोगावले यांच्या शिंदे गटाला बसलेला मोठा राजकीय धक्का अजून सावरत नाही, तोच आता उपनगराध्यक्ष अनिकेत पानसरे यांची प्रभारी नगराध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने पुन्हा एकदा जोरदार धक्का मानला जात आहे. खासदार सुनील तटकरे यांनी नगरपंचायतीतील सत्तेचे गणित एका झटक्यात पालटले असून, हा तटकरे विरुद्ध गोगावले संघर्षातील निर्णायक टप्पा मानला जात आहे. म्हसळा नगरपंचायतीत झालेल्या या घडामोडींनी रायगडच्या राजकारणात खळबळ उडवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात गेलेल्या नगराध्यक्षांसह सात नगरसेवकांविरोधात गटनेते संजय कर्णिक यांनी उभारलेल्या कायदेशीर लढ्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अपात्र ठरविले. यानंतर नगरपंचायतीतील सत्तासमीकरण पूर्णपणे बदलले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मंगळवारी उपनगराध्यक्ष अनिकेत पानसरे यांची प्रभारी नगराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या निर्णयामुळे तटकरे आणि गोगावले यांच्यातील राजकीय संघर्षात तटकरे यांनी बाजी मारल्याचे स्पष्ट झाले. पानसरे यांच्या निवडीचे गटनेते संजय कर्णिक यांनी स्वागत करत अभिनंदन केले.
या निवडीबाबत खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, तालुका अध्यक्ष समीर बनकर आणि सर अध्यक्ष रियाज घराडे यांनी शुभेच्छा दिल्या. पानसरे यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष संजय दिवेकर, सरोज म्हशीलकर, जयश्री कापरे, सुनील शेडगे, नौशीन चोगले आणि स्वीकृत नगरसेवक निकेश कोकचा यांनी त्यांचे अभिनंदन केले. अधिकृत सूत्रांनुसार, लवकरच नगराध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असून, तोपर्यंत अनिकेत पानसरे प्रभारी नगराध्यक्ष म्हणून कामकाज पाहतील. म्हसळा नगरपंचायतीतील या बदलामुळे पुढील राजकीय समीकरणांवर दूरगामी परिणाम होण्याची चिन्हे दिसत आहेत.







