। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ गावामध्ये गेली 57 वर्षे सार्वजनिक स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराज यांची जंयती तिथीप्रमाणे साजरी केली जाते. यावर्षी 17 मार्च रोजी सार्वजनिक स्वरूपात साजरी होणार आहे. दरम्यान, या सोहळ्यासाठी शिवजयंती उत्सव समितीची स्थापन करण्यात आली असून अध्यक्ष म्हणून विशाल साळुंके यांची निवड करण्यात आली आहे. 17 मार्च रोजी भव्य स्वरूपात शिवाजी महाराज यांची जंयती साजरी करण्यासाठी समिती कामाला लागली असून या समितीला नेरळमधील सर्व राजकीय पक्षांचा पाठिंबा असतो.
यावेळी राज्यातील वेगवेगळ्या भागातील गडकिल्ल्यावरून शिव दौड नेरळ येथे आणली जाते. तर, मुख्य आकर्षण असलेली मिरवणूक आणि सांस्कृतिक कार्यक्रम, रंगावली स्पर्धा, व्याख्यान अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी येथील श्री हनुमान मंदिरात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत नेरळ सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची स्थापना करण्यात आली. यावेळी जेष्ठ कार्यकर्ते सुधाकर देसाई, किसन शिंदे, नेरळ व्यापारी फेडरेशन अध्यक्ष मनोहर आयरे तसेच, मोठ्या प्रमाणात तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.