मुख्यमंत्र्यांना शिवसैनिकांनी दाखविले काळे झेंडे

| पेण | प्रतिनिधी |

पहिल्यांदा खासदारांनी पाहणी केली, त्यानंतर बांधकाममंत्री आले आणि आता दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी येऊन मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. पाहणी करणे हा एक प्रसिद्धी मिळविण्याचा स्टंट आहे. मात्र, निकाल येरे माझ्या मागल्या. त्यामुळे सत्ताधार्‍यांनी ही स्टंटबाजी आता बंद करावी, असा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दिला आहे. सोमवारी (दि. 26) मुंबई-गोवा महामार्गाच्या पाहणी दौर्‍यादरम्यान पेण तालुक्यातील वाशी नाका येथे शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून तब्बल 16 वर्षे कोकणवासीय व चाकरमान्यांना महामार्गावरील खड्ड्यांतून प्रवास करायला लावणार्‍या सरकारचा निषेध केला.

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावर असलेले पेण तरणखोप येथील गिरोबा हॉटेल येथे महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते निषेध करण्याकरिता जमले होते. मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात होता. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांनी कारवाई करीत त्यांना ताब्यात घेतले.

शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख विष्णूभाई पाटील, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे गनिमी काव्याची आखणी करून शिवसैनिकांची दुसरी टीम तयार केली व गनिमी कावा करीत वाशी नाक्यावर मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत घोषणा देत निषेध नोंदविला. पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवल्याने शिवसैनिकांना ताब्यात घेतले.

मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या खड्ड्यांमुळे मागील सोळा वर्षांत अनेक निष्पाप प्रवाशांचा बळी गेला आहे. मागील वर्षी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तब्बल सात वेळा या महामार्गाची मॅरेथॉन पाहणी केली होती; परंतु हजारो कोटी रुपये खर्च करूनसुद्धा या महामार्गाची अवस्था बिकट असल्याने महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही आज मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख विष्णूभाई पाटील यांनी यावेळी दिली. केवळ मतांचा मलिदा मिळवण्याकरिता कोकणवासियांची दिशाभूल करण्याकरिता मुख्यमंत्र्यांचा हा पहाणी दौरा असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी यावेळी केला.

यावेळी विष्णूभाई पाटील, सुरेंद्र म्हात्रे यांच्यासह जिल्हा समन्वयक नरेश गावंड, महिला आघाडीच्या दीपश्री पोटफोडे, तालुका प्रमुख जगदीश ठाकूर, युवासेनेचे आमिर ठाकूर, कैलास गजने, प्रकाश पाटील, धनंजय गुरव, दर्शना जवके, मेघना चव्हाण, वैशाली समेळ, छाया काईनकर, काँग्रेसचे चंद्रकांत पाटील, नंदा म्हात्रे, तालुका अध्यक्ष अशोक मोकल, पाली तालुका प्रमुख दिनेश चिले, पाली शहर प्रमुख विद्येष आचार्य, राजाराम पाटील, नंदु मोकल, लवेद्र मोकल, गजानन मोकल, चंद्रहास म्हात्रे, शिवाजी म्हात्रे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

ठेकेदाराची चलाखी अंगलट
सिमेंटमिश्रित खडीने खड्ड्यांमध्ये चिखल

नागोठणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महामार्गाची पाहणी करणार असल्याचे समजताच खडबडून जागे झालेल्या महामार्गाच्या ठेकेदाराने सिमेंटमिश्रित खडीचा वापर करून महामार्गावरील खड्डे भरण्यास सुरुवात केली. मात्र, भरपावसात हे खड्डे भरण्याचे काम सुरू केल्याने व पावसाची संततधार सुरूच असल्याने खड्ड्यातील या मिश्रणाचा चिखल झाला आहे. याच चिखलातून सोमवारी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहन चालकांना मार्गक्रमण करावे लागले.
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे भरून गणेशोत्सवापूर्वी रस्ता सुस्थितीत करण्यात येईल, असे आश्‍वासन सरकारी यंत्रणांकडून तसेच महामार्ग ठेकेदार असलेल्या कल्याण टोल प्लाझाकडून देण्यात आले होते. मात्र, गेले पंधरा दिवसांपूर्वी पावसाने पूर्णतः विश्रांती घेतलेली असताना व कडाक्याचे ऊन पडत असतानाही महामार्ग दुरुस्तीचे काम न करणार्‍या ठेकेदाराने दोन-तीन दिवसापासून पुन्हा एकदा जोराने सुरू झालेल्या भरपावसात सिमेंट खडीच्या मिश्रणाने खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भरपावसात भरलेले हे खड्डे किती काळ तग धरतील, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर भरपावसात महामार्गावरी खड्डे भरण्याच्या या प्रकारामुळे वाहनचालक व नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Exit mobile version