| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाच्या धर्तीवर काल (दि.२१) शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करून ४० आमदारांना घेऊन सुरतला गेले होते. आज (दि.२२) रोजी हे सर्व आमदार विशेष विमानाने गुवाहाटीला दाखल झाले आहेत. गुवाहाटी विमानतळाबाहेर खास तीन बसेस तयार असून याठिकाणी भाजपचे काही नेतेही उपस्थित आहेत. यावेळी त्यांच्या सोबत प्रहार संघटनेचे बच्चू कडूही असून या सर्व आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या समर्थन पत्रावर सह्या केल्या आहेत.
४० आमदारांना घेऊन रात्री उशिरा विशेष विमान सुरतवरून गुवाहाटीला निघाले होते यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे मोहित कंभोज होते. ते पहाटे ६:३० वाजता गुवाहाटी विमानतळावर पोहचले असून याठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. इथून ते जवळच असणाऱ्या हॉटेल रॅडिसनवर जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व पुढे घेऊन जाण्यासाठी एकत्र आलो आहोत. आमच्या सोबत ४० आमदार असून आणखी १० आमदार येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.