महायुतीचा आहार कुपोषित; चिमुकल्यांच्या जीवाशी हेळसांड
। पेण । संतोष पाटील ।
लहान मुलांकडे देशाचे उज्ज्वल भविष्य म्हणून पाहिले जाते. देशाच्या प्रगतीत त्यांचे योगदान असावे, यासाठी सरकारकडून कोट्यवधी रुपये त्यांच्या शिक्षणासाठी खर्च केले जातात. लहानपणापासूनच या चिमुकल्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी त्यांना शालेय पोषण आहार देण्याची सुरुवात सरकारने केली. मात्र, या आहारातून मुलांचे पोषण नाही, तर त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पेण तालुक्यातील वळखळ अंगणवाडीत मुलांच्या पोषण आहाराच्या पाकिटामध्ये चक्क मेलेला उंदीर आढळला आहे. या प्रकारामुळे प्रशासनाचा अनागोंदी कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

पेण तालुक्यातील वडखळ अंगणवाडीमध्ये महाराष्ट्र शासनाकडून सहा महिने ते तीन वर्षांच्या बालकांसाठी येणार्या खाऊचे वाटप सुरु असताना एका पिशवीमध्ये अंगणवाडी सेविकांना संशयास्पद कडक वस्तू असल्याचे आढळून आले. त्यावेळी त्यांनी ते पाकीट फोडले असता त्यामध्ये कुजलेल्या अवस्थेत उंदीर आढळून आला. त्याच वेळी तातडीने अंगणवाडी सेविकेने समोरच ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सरपंच व सदस्यांना बोलावून झालेला प्रकार सांगितला. आमच्या प्रतिनिधीने जाऊन पाहिले तर संपूर्ण अंगणवाडीत दुर्गंधी सुटलेली होती. तर, उंदीर पाकिटात असलेल्या खाऊलादेखील दुर्गंधी सुटली होती.
त्यामुळे तातडीने तालुका एकात्मिक बालविकास अधिकरी प्रवीण पाटील यांना संपर्क केला. परंतु, प्रवीण पाटील यांनी थातुरमातुर उत्तर देऊन परिस्थितीचे गांभीर्य जाणून घेतले नाही. त्यावेळेला आमच्या प्रतिनिधीने रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्याशी संपर्क केला आणि सर्व फोटो व्हॉट्सअॅपद्वारे दिले. त्यावेळेला मात्र प्रशासनाची हालचाल सुरु झाली. विस्तार अधिकारी डी.एच. जाधव हे घटनास्थळी पोहोचले. त्यांच्या अगोदर पर्यवेक्षिका रश्मी झेमसे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करण्यास सुरूवात केली.
महत्त्वाची बाब म्हणजे, मल्टी मिक्स सिरीयल्स अॅन्ड प्रोटिन्स या पाकीटमध्ये पाव किलोच्यावर उंदीर होता. यदा कदाचित अंगणवाडी सेविकेच्या नजरेतून ही बाब लक्षात आली नसती, तर सर्वसामान्य मुलांच्या आरोग्याशी खेळ झाला असता. झालेला सर्व प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन आज नव्याने पेण तालुक्याचा गटविकास अधिकार्याचा भार सांभाळणार्या सोनल सूर्यवंशी यांनी वडखळ येथे विस्तार अधिकारी आणि सहाय्यक गटविकास अधिकारी यांना घेऊन अंगणवाडीला भेट दिली व तातडीने पंचनामा करण्यास सांगितला.
अन्नपदार्थ पुरवणारा ठेकेदार महाराष्ट्रातील नसून राजस्थानचा आहे. त्यामुळे ठेकेदाराला महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी काहीही घेणे-देणे नाही. सरकारने निकृष्ट दर्जाचा अन्न पुरवठा करणे, ही चुकीची बाब आहे. यामध्ये अंगणवाडी सेविकांचा दोष नाही, मात्र सरकारने चांगल्या प्रतीचे अन्न पुरविणे गरजेचे आहे.
योगेश पाटील,
मा.सरपंच, वडखळ
वडखळ येथील झालेल्या प्रकाराबाबत तातडीने बालविकास विभागाच्या अधिकार्यांना पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
डॉ. भरत बास्टेवाड,
मुख्य कार्यकारी अधिकारी, राजिप
घटनेचे गांभीर्य नाही
चिमुकल्यांच्या जीवाशी हेळसांड होत असताना, आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार्या किळसवाण्या प्रकाराबाबत कृषीवलच्या प्रतिनिधीने तात्काळ तालुका एकात्मिक बालविकास अधिकरी प्रवीण पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. परंतु, प्रवीण पाटील यांनी थातुरमातुर उत्तर देऊन परिस्थितीचे गांभीर्यसुद्धा जाणून घेतले नाही, याबाबत पालकांमधून संताप व्यक्त होत आहे.
लाडक्या भाच्यांना सरकारकडून उंदीर
राज्य शासनावर सर्वसामान्य जनता ही डोळे झाकून विश्वास ठेवते. प्रशासनाकडून आपल्याला सर्वोत्तम सुविधा दिल्या जातात, अशी भावना नागरिकांमध्ये असते. त्यामुळे राज्य शासनाकडून दिल्या जाणार्या सर्वच गोष्टी चांगल्या असतात असं लाडक्या बहिणी धरुन चालतात. मात्र वडखळ अंगणवाडी येथील पोषण आहाराच्या पाकिटात उंदीर सापडल्याने लाडक्या भाच्यांना उंदीर खाऊ घालणार्या सरकारविरोधात लाडक्या बहिणींनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ
राज्य शासनाकडून गर्भवती माता आणि बालकांना पोषण आहार दिला जातो. पण राज्यातील अंगणवाडी आणि शाळांमधून दिला जाणारा पोषण आहार हा खरंच पोषण आहार आहे की विष आहे? असा प्रश्न निर्माण व्हावा अशा घटना समोर येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे असा प्रश्न निर्माण व्हावा, अशी ही पहिली घटना नाही. याआधीदेखील राज्यात अनेकदा अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. तरीदेखील झोपलेल्या प्रशासनाला जाग येत नसल्यानं नागरिकांनी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.