धक्कादायक! रुग्णवाहिकेचा स्फोट; रुग्णाचा मृत्यू

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना;वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्ण महिलेचा मृत्यू
| खोपोली | प्रतिनिधी |
मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवर एका रुग्णवाहिकेला अचानक आग लागून स्फोट झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. या अपघातात रुग्णवाहिकेतील निलवा कवलदार या रुग्ण महिलेचा जागीच मृत्यू झाला.

मुबंई- पुणे एक्सप्रेस वेवरून रुग्णवाहिका रुग्णाला घेऊन पुण्याकडे जात होती. यावेळी बोरघाटात आले असताना ती अचानक बंद पडली. त्यामुळे त्यातील रुग्ण महिला व तिचे नातेवाईक तात्काळ गाडीतून खाली उतरले. तेवढ्यात रुग्णवाहिकेने पेट घेतला. ही आग एवढी भीषण होती की, या आगीत रुग्णवाहिकेचा मोठा स्फोट झाला. दरम्यान, रुग्ण महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, बोरघाट पोलीस, अपघातग्रस्त टीमचे सदस्य, देवदूत यंत्रणा, अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न केले. यामुळे काही काळ एक्सप्रेसवेची वाहतूक रोखण्यात आली होती.

Exit mobile version