धक्कादायक! दारुसाठी पैसे न दिल्याने मारहाण

| पुणे | प्रतिनिधी |

जामिनावर सुटलेल्या आरोपींकडून पुण्यात एकाची हत्या, ३ आरोपींपैकी दोघे अल्पवयीन असल्याची माहिती, दारुसाठी पैसे न दिल्यानं आरोपींनी तिघांवर हल्ला केल्याची माहिती.

पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. दारुसाठी पैसे देण्यास नकार देणाऱ्या जेष्ठ नागरिकाचा पुण्यातील परिहार चौकासारख्या उच्चभ्रू परिसरात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीला डोक्यात रॉड मारुन मारहाण केली. यामध्ये वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. समीर रॉय चौधरी (77) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते टाटा कंपनीतुन सेवावृत्त झाल्यावर पुण्यातील औंध भागात स्थायिक झाले होते. गुरुवारी (दि.13) पहाटे सव्वा पाच वाजता ते मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडले आणि परिहार चौकालगत असलेल्या फुटपाथवरून ते निघाले. त्यावेळी रात्रभर दारु पार्टी केलेले चार जण बाहेर पडले होते. त्‍यांना आणखी दारू हवी होती आणि त्यासाठी पैसे हवे होते.

त्यासाठी त्‍यांनी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या व्यक्तींवर हल्ले सुरु केले. दोन व्यक्तींवर हल्ला केल्यावर या टोळक्याने समीर रॉय चौधरी यांना गाठले. टोळक्याने त्यांच्याकडे दारुसाठी पैशांची मागणी केली. मात्र, त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे वैतागलेल्या टोळक्याने समीर रॉय चौधरी यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने घातला. यामध्ये समीर रॉय चौधरी गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली असून विशेष म्हणजे त्यातील तीन आरोपी हे अल्पवयीन आहेत. त्यापैकी दोन अल्पवयीन आरोपींवर आधीच हत्येचा गुन्हा दाखल असुन मागील आठवड्यातच ज्युवेनाईल कोर्टाने त्यांची बाल निरीक्षण गृहातून जामीनावर सुटका केली होती. त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या हातून घडणाऱ्या गुन्ह्यांना रोखण्याचे कायदेशीर आव्हान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Exit mobile version