| अकोला | प्रतिनिधी |
अकोल्यातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील जुना हिंगणा येथील शेजारी राहणाऱ्या दोन जणांच्या किरकोळवादामधून एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि.7) पहाटेच्या सुमारास घडली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सविता ताथोड (40) आणि तीस वर्षीय आरोपी धीरज ठाकूर यांच्या घरातील महिलांसोबत दोन महिन्या आधी किरकोळ वाद झाला होता. सविता ताथोड यांच्या पश्चात दोन मुलं आणि नवरा असा आप्त परिवार आहे, सात मार्च रोजी सविता ताथोड यांच्या मुलाचं लग्न होतं लग्नाची तयारी जोरात सुरू होती आणि असा अनर्थ घडला. मृत सविता ताथोड या पहाटे सहाच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या एका महिलेसोबत मॉर्निंग वॉकला गेल्या असता आरोपी धीरज ठाकूरने घराच्या काही अंतरावरच असलेल्या मुख्य रस्त्यावर सविता ताथोड यांना गाठलं, अडवून त्यांचा गळा आवळला आणि खाली पाडलं. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या महिलेने आणि एका व्यक्तीने सविता ताथोड यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने सविता ताथोड यांचं डोकं रस्त्यावर जोराने आपटून त्यांना रक्तबंबाळ केलं काही वेळातच सविता ताथोड यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने तेथून पळ काढला. पोलीस घटनास्थळी पोहोचले. या घटनेचा पुढील तपास सुरु आहे.