| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापू यांना वैद्यकीय आधारावर अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. आपल्याच गुरुकुलातील विद्यार्थिनीसोबत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला सुप्रीम कोर्टाने वैद्यकीय कारणामुळे 31 मार्चपर्यंत जामीन मंजूर केला आहे. आसाराम यांना जोधपूर मध्यवर्ती कारागृहातून भगत की कोठी येथील हेल्थ केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आसाराम हृदयरोगी असून त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला होता. वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर करताना सोबत पोलीस तैनात करण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रीम कोर्टाने आसारामला जामीन देताना काही अटीही घातल्या आहेत. यात अशीही अट आहे की तो आपल्या अनुयायांना भेटू शकत नाही. आसाराम बापू 2013 सालच्या बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. विशेष म्हणजे पीडित अल्पवयीन मुलीच्या बहिणीनेही आसारामचा मुलगा नारायण साई याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात एप्रिल 2019 मध्ये नारायण साईला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. आसारामला ज्या खटल्यात शिक्षा सुनावण्यात आली त्या प्रकरणातील एफआयआर अहमदाबादमधील चांदखेडा पोलीस ठाण्यात 2013 साली दाखल करण्यात आला होता.