। मुंबई । प्रतिनिधी ।
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे कसे संबंध आहेत. व्यवहार एकत्र आहेत. जमिनी एकत्र आहेत. कंपनी एकत्र आहे. दहशत एकत्र आहे. कराड आणि मुंडे यांचे याबाबतचे हजारो व्हिडीओ समोर आले असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या आहेत. एवढं सगळं होऊनही धनंजय मुंडेंनी जनाची नाही तर किमान मनाची लाज बाळगायला हवी आणि राजीनामा दिला पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया दमानिया यांनी व्यक्त केली आहे. मुंडे जोपर्यंत राजीनामा देणार नाहीत, तोपर्यंत लढायला हवं असेही दमानिया म्हणाल्या आहेत.
अंजली दमानिया यांनी सोमवारी (दि.6) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी, मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली. अंजली दमानिया यांनी बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. त्यात, बीड जिल्ह्यातील सर्व विभागातील अधिकार्यांची नेमणूक बिंदू नामावलीप्रमाणे झाली आहे का, याची चौकशी व्हावी. तसेच, बीड जिल्ह्यातील विना नंबर प्लेटची वाहने ताब्यात घ्यावा. वाल्मिक कराडच्या नावावर अनेक बार आहेत. कायदा धाब्यावर बसवून हे परवाने देण्यात आले आहेत, त्यावर चौकशी आणि कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांनी जॉईंट सीपी क्राईम आणि मुंबई पोलीस आयुक्तांना तक्रार देण्याचे देखील सांगितले असल्याचे दमानिया यांनी सांगितले आहे.
इन कॅमेरा चौकशीची मागणी
बीड हत्या प्रकरणात नेमलेली एसआयटी रद्द करण्यात यावी. या एसआयटीमध्ये वाल्मिक कराड आणि इतर आरोपींचे जवळचे संबंध असलेले अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नेमलेले आहेत. बीड हत्याप्रकरणाची सर्व चौकशी इन कॅमेरा घेण्यात यावी. वाल्मिक कराड आणि इतर आरोपींना ज्या कोठडीत ठेवण्यात आले आहे, त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात यावा. अशी मागणी अंजली दमानिया यांच्याकडून करण्यात आली आहे.
वाल्मिक करडा हा मुंडेंच्या जवळचा कार्यकर्ता आहे. तर, हत्येतील आरोपी विष्णू चाटे त्यांच्या पक्षाचा तालुकाध्यक्ष होता. सर्वच आरोपींचे धनंजय मुंडेंसोबत जवळचे संबंध समोर येत आहेत, त्यामुळे त्यांनी स्वतःहून राजीनामा देऊन निःष्पक्ष चौकशीची वाट मोकळी करुन द्यायला पाहिजे.
अंजली दमानिया,
सामाजीक कार्यकर्ती