। मुंबई । प्रतिनिधी ।
विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणी, आशा सेविकांपासून शेतकर्यांपर्यंत घोषणा आणि आश्वासनांचा पाऊस पाडला होता. शेतकरी कर्जमाफी देणार म्हणजे देणारच, असा आव भाजपाने जाहीरनाम्यात आणला होता. परंतु, भाजपा याबाबतीत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे, तुमचा तो आव आता कुठे गेला? असा प्रश्न ठाकरे गटाने केला आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी ही सर्व मंडळी राज्यातील तमाम ‘लाडक्या बहिणीं’चे ‘लाडके भाऊ’ वगैरे झाले होते. या योजनेवरून त्यांनी स्वतःच स्वतःला पंचारती ओवाळून घेतल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत या मंडळींना जे यश मिळाले त्यात मोठा वाटा याच लाडक्या बहिणींचा आहे, असे ते मोठ्या तोंडाने सांगत होते. मात्र, आता सत्तेत बसल्यावर यांच्या मोठ्या तोंडाचा चंबू झाला आहे आणि लाडक्या बहिणींना ‘निकषां’च्या चाळणीमध्ये ढकलण्याचे उद्योग त्यांनी सुरू केले आहेत. या चाळणीतून सुमारे 50 लाख ‘लाडक्या’ बहिणी ‘नावडत्या’ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, निकषांत न बसणार्या बहिणींना अपात्र ठरवून त्यांच्या खात्यात जमा झालेले पैसे परत सरकारजमा करण्याच्या ‘सावकारी’ला सुरुवातदेखील झाली आहे, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे. धुळे जिल्ह्यातील एका लाडक्या बहिणीला सरकारच्या या घूमजाव धोरणाचा फटका बसला आहे. तिला मिळालेले 7 हजार 500 रुपये परत सरकारजमा करण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी उफाळून आलेले सत्ताधार्यांचे ‘बंधूप्रेम’ सत्तेत बसताच असे आटत चालले आहे, असे टीकास्त्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सोडले आहेत.
मोदी सरकारच्या महाराष्ट्रातील ‘चेले-चपाटे’ सरकारनेही राज्यातील शेतकर्यांच्या तोंडाला पानेच पुसली आहेत. जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफी देऊ, असे सांगायचे आणि सत्तेत बसल्यावर हात वर करायचे. शेतकर्यांच्या कर्जमाफीवरूनही या मंडळींनी घूमजाव केले आहे. खुद्द राज्याच्या कृषी मंत्र्यांनीच लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ‘ताण’ पडत असल्याने शेतकर्यांनी कर्जमाफी विसरावी, असे जाहीर करून हात वर केले आहेत, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.