मुरूड बस आगारात मनुष्यबळाची कमतरता; डबल ड्युटी

लांबपल्यासाठी देखील जुन्या बस गाड्या

| मुरूड जंजिरा | वार्ताहर |

गणेशोत्सव अगदी नजीक येऊन ठेपला तरी मुरूड बस आगारात प्रवाशांसाठी एकही नवीन बस उपलब्ध नाही. सर्व मदार सुमारे आठ वर्षांच्या जुन्या बस गाड्यांवर आहे. यातील काही एस बस गाड्या कुठेही ब्रेकडावून होत आहेत. आतील गंभीरबाब म्हणजे लांब पल्यांच्या प्रवासासाठीदेखील याच गाड्या वापरल्या जात आहे. त्याचप्रमाणे आगारात कर्मचारी कमी असल्याने अनेक चालक, वाहकांना डबल ड्युटी करावी लागत आहे. मुरूड एटी बस आगारातून मुंबई-12, पुणे-3, बोरिवली-4, कल्याण- 2, ठाणे-2, धुळे-2, शिर्डी-2 आणि 6 लोकल अशा 33 फेऱ्या चालविण्यात येतात. या सर्व सेमीलक्झरी, लालपरी सारख्या बसेस जुन्या असून सध्या एकही नवीन बस मुरूड आगाराच्या सेवेत नाही. यातील काही बसेस गळक्या देखील आहेत. पुण्याकडे जाणाऱ्या एका बसचा हा अनुभव जेष्ठ पत्रकार आणि वकिल यांना आला आहे.

मुरूड तालुका हा पर्यटन तालुका असून अनेक पर्यटक देखील एसटी बसने मुरुडला येत असतात. काही बसच्या खिडक्यांच्या काचा लागत नाहीत. तर काही बसेस मध्येच बंद देखील पडतात. पावसाळ्यात खूप त्रास होतो. मुरूड तालुका हा डोंगरी तालुका आहे. येथे उत्तम कार्यक्षमता असणाऱ्या बसेसची गरज आहे. प्रत्यक्षात आठ वर्षांपेक्षा जून्या गाड्या प्रवासी गाड्या म्हणून चालविल्या जात आहेत. लांब पल्यासाठी देखील अशाच बसेस वापरण्यात येत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. मुरूड तालुक्यात एस टी बस सेवा हीच सरकारी एकमेव प्रवाशी सेवा असून या सेवेवर विश्वास आणि निर्धास्तपणे विसंबून प्रवाशी प्रवास करीत असतात. अर्धशहरी किंवा ग्रामीण भागात सुरक्षित प्रवास म्हणून अजूनही एस टी सेवेवर लाखो प्रवाशांचा विश्वास आणि श्रद्धा आहे. महाराष्ट्र एस टी महामंडळाने हे लक्षात घेऊन या श्रद्धेला तडा जाणार नाही याची काळजी घ्यावी एवढीच माफक अपेक्षा प्रवाशी वर्ग करीत असतो. परंतु एस टी प्रशासन या कडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. जुन्या बसेस रस्त्यावर कोणत्याही ठिकाणी बंद पडत असल्याने प्रवाशांना आपल्या नियोजित ठिकाणी पोहचण्यासाठी विलंब होत आहे. त्यामुळे प्रवाशी वर्गात संतप्त वातावरण पसरले आहे. एस टी चे कर्मचारी देखील हैराण झाल्याचे चित्र आहे.

कमी मनुष्यबळात जादा काम
मुरूड एस टी आगाराचे रोजचे उत्पन्न सुमारे 4 लाख आहे. मुरूड आगारातून या पूर्वी 43 फेऱ्या चालविल्या जात होत्या. आगारातील बदली झालेले आणि सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागी नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली नसल्याने मुरूड आगारात मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. त्यामुळे अनेक चालक- वाहकांना डबल ड्युटी करावी लागत आहे. या प्रकारामुळे सध्या 33 फेऱ्या जेमतेम चालविल्या जात असल्याचे दिसून येते. 2007-08 मध्ये मुरूड आगारचा रायगडाच्या उत्पन्नात प्रथम क्रमांक लागला होता. आता देखील रोजचे उत्पन्न उत्तम आहे.परंतु नवीन बसेसची मोठी गरज आहे असे स्पष्ट दिसत आहे.मुरूड आगरा साठी या पूर्वीच नवीन बस दयायला हव्या होत्या.परंतु जास्त लांबी असणाऱ्या 10 हिरकणी बसेस रेवदंडा- साळाव पुलाच्या दुरुस्तीचे काम दोन महिने सुरू असताना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे 16 टन वजन असणाऱ्या आणि लांबी जादा असणाऱ्या हिरकणी बसेसना 12 टन क्षमतेच्या रेवदंडा- साळाव पुलावरून जाण्यास मज्जाव असल्याने काही दिवस हिरकणी गाडया मुरूड आगारात उभ्या राहुन अखेर स्वारगेट (पुणे) डेपोकडे पाठविण्यात आल्या. आता जुन्या 34 बसेस आहेत. मुरुड आगारात अशीच दुरावस्था कायम राहिली तर प्रवाशांना नाईलाजाने खाजगी प्रवाशी वाहतुकीकडे जाण्यावाचून पर्याय राहणार नाही असे प्रवासी वर्गातून ऐकायला मिळत आहे. रायगड विभागाने प्रवासी वर्गाच्या या समस्येकडे गंभीरपणे पाहून विशेष बाब म्हणून नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात, आवश्यक कर्मचाऱ्यांची तातडीने नियुक्ती करावी अशी मागणी प्रवाशांतून सातत्याने होत आहे.

250 कर्मचाऱ्यांची गरज प्रत्यक्षात-170 कर्मचारी
मुुरूड बस आगारात 250 कर्मचार्यांची गरज आहे. मात्र सध्या फक्त एकूण 170 कर्मचारी कार्यरत आहेत.वर्कशॉप मध्ये 40 कर्मचाऱ्यांची गरज असताना फक्त 27 कर्मचारी असल्याने खुप कामाचा ताण येत आहे. निम्या म्हणजे 17 बसेस आधिक जुन्या असल्याने दुरुस्तीचे प्रमाण वाढले आहे.चालक- वाहक देखील कमी आहेत. सकाळी 8-30 वाजता अलिबाग मार्गे जाणारी सेमी लक्झरी बस नंतर दोन तासानंतर 10-30 ला जाणाऱ्या सेमी लक्झरी बस वर कमालीचा लोड येत आहे. मधल्या वेळेत बस नाही.मुरूड भालगाव रोहा मार्गे मुंबई कडे जाणारी एकमेव परिवर्तन बस बऱ्या पैकी नवीन आहे.मुरूड आगाराच्या सेवेत लवकरच नवीन बस गाड्या येणार असून आम्ही तशी वरिष्ठ कार्यासयाकडेे मागणी केल्याची माहिती आगार व्यवस्थापक नीता जगताप यांनी दिली.

Exit mobile version