खेलो इंडिया अंतर्गत राष्ट्रीय स्पर्धेमध्ये ठरल्या रौप्य पदकाच्या मानकरी
। अलिबाग । प्रतिनिधी ।
खेलो इंडिया अंतर्गत गतका मार्शल आर्ट या खेळामध्ये अलिबागच्या दोन मुलींनी रौप्य पदक प्राप्त केले. महाजने येथील श्रमिका श्रीधर पाटील व पेढांबे येथील तन्मयी सुधीर पाटील यांनी गतका मार्शल आर्ट यामध्ये फरी सोटी या खेल प्रकारातून यश संपादन केले. विशेष म्हणजे महाराष्ट्राला या खेळामध्ये पहिल्यांदाच पदक मिळाले आहे. श्रमिका पाटील आणि तन्मयी पाटील यांनी गगन भरारी घेत अलिबाग तालुक्यासह महाजने व पेंढाबे या गावांचे नाव लौकीक केले.
बिहार राज्यातील गया येथे खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील महाजने येथील श्रमिका श्रीधर पाटील हीने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करीत रौप्य पदक मिळविले. श्रमिकाने अगदी कमी कालावधीत गगन भरारी घेतली आहे. तिच्या या यशामुळे महाराष्ट्र राज्यासोबतच रायगड जिल्हा, अलिबाग तालुका व महाजने गावाचे नाव उज्वल झाले आहे. श्रमिका ही एक ग्रामीण भागातील विद्यार्थीनी आहे. आई, वडीलांकडून मिळालेले प्रोत्साहन, संकल्प, मेहनत व जिद्दीच्या जोरावर तीने यश संपादन केले आहे. शहरी वस्तीपासून दूरवर असलेल्या महाजनेसारख्या खेडेगावातील या मुलीने खेळाच्या माध्यमातून स्वतःसाठी नवे करिअर उभे केले. श्रमिका पाटील आणि तन्मयी पाटील या दोघींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मिडीयावर त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.