श्री सेवाशक्ती पतसंस्थेचा ‘बँको’ पुरस्काराने सन्मान

| अलिबाग | वार्ताहर |

अलिबाग तालुक्यातील चोरोंडे-मापगाव येथील सहकार क्षेत्रात चमकदार कामगिरी करणार्‍या श्री सेवा शक्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेस सलग सहाव्या वर्षीही बँको पब्लिकेशन कोल्हापूर तथा गॅलेक्सी इन्मा संस्था पुणे यांच्यावतीने ब्ल्यू रिबन बँको 2023 या मानाच्या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दमण येथील डेल्टिन रिसॉर्ट येथे नुकत्याच झालेल्या सोहळ्यात बँको अविज पब्लिकेशनचे मुख्य संपादक अविनाश शिंत्रे व गॅलक्सी इन्माचे संचालक अशोक नाईक यांच्या उपस्थितीत माजी सहकार आयुक्त तथा माजी प्रधान सचिव मधुकर चौधरी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार श्री सेवा शक्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सीताराम कवळे व संचालक नितीन अधिकारी, राजन नार्वेकर, सुनिल थळे व प्रकाश ठाकूर यांनी स्वीकारला.

या पतसंस्थेत 30 कोटी 25 लाख रुपयांच्या ठेवी आहेत. 23 कोटी 45 लाख रुपयांचे कर्ज वाटप झालेले असून, 11 कोटी 35 लाखांची गुंतवणूक केलेली आहे. भाग भांडवल 1 कोटी 93 लाख रुपयांचे आहे. सी.डी. रेश्यो 70 टक्के, रोखता निधी, तरलता निधी, सीआरएआर यांचे योग्य प्रमाण आहे. ही पतसंस्था 9001-2015 मानांकन प्रमाणित असून सतत 6 वर्ष बँको पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचा सतत दोन वर्ष दीपस्तंभ पुरस्कार मिळाला आहे. स्थापनेपासून सतत ऑडिट वर्ग ‘अ’ या पतसंस्थेने मिळवला आहे. तत्पर विनम्र सेवा, सर्व व्यवहारांकरीता एसएमएस सेवा, ठेवींवर आकर्षक व्याजदर, अल्प व्याजदरात त्वरीत कर्ज, संगणकीकृत अर्थिक व्यवहार व वातानुकुलीत सेवा ही या पतसंस्थेची वैशिष्ठे आहेत. पतसंस्थेच्या यशामध्ये पतसंस्थेचे संचालक, सभासद, ग्राहक, अधिकारी व कर्मचारी यांनी बहुमोल योगदान असल्याची प्रतिक्रिया पतसंस्थेचे अध्यक्ष सीताराम कवळे यांनी दिली. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री सेवा शक्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Exit mobile version