। उरण । प्रतिनिधी ।
पनवेल तालुक्यातील तामसई येथील सृष्टी राजू शिद ही उरण तालुक्यातील चिरनेर आदिवासी आश्रमशाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकत होती. अचानक तिच्या पोटात दुखायला लागले. सृष्टी आणि तिच्या मैत्रिणींनी आश्रमशाळेतील असणार्या शिक्षकांना सांगितले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले. नंतर काही तासाने सृष्टीला उपचारासाठी पनवेल येथे नेण्यात आले. उपचार चालू असताना सृष्टी शिदचा मृत्यू झाला आणि पीडित कुटुंबाला धक्का बसला.
आश्रमशाळेतील व्यवस्थापकीय मंडळीनी जर वेळेत सृष्टीचा उपचार केला असता तर त्या चिमुकलीचा जीव वाचला असता, असा पालकांनी आरोप करत शाळा व्यवस्थापकीय मंडळीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. यासाठी सृष्टीचे आई-वडील आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याला अनेकदा पत्र दिले. मात्र गुन्हा दाखल झाला नाही. शेवटी आई वडिलांनी पोलीस उपायुक्त, परीमंडळ 2 कार्यालयासमोर उपोषण करण्याचे पत्र दिले आणि मंगळवारी (दि.11) रोजी सकाळी 11 वाजता उपोषणाला सुरुवात करताच सहाय्यक पोलीस आयुक्त व वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी दखल घेतली.
यावेळी आदिवासी समन्वय समिती रायगड जिल्हा अध्यक्ष गणपत वारगडा, लक्ष्मण शिद, सृष्टीचे आई-वडील शोभा राजू शिद आणि त्यांचे नातेवाईकांसह तात्काळ उरण पोलीस ठाण्यात गेले. त्यानंतर सायंकाळी 7 च्या सुमारास चिरनेर आदिवासी आश्रमाशाळेतील मुख्याध्यापक आप्पासाहेब मोरे, अधीक्षक सतीश मोरे, शिक्षक महादेव डोईफोडेसह इतर शिक्षक आणि कर्मचार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात उरण वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ, पोलीस उप निरीक्षक संजय साबळे अधिक तपास करीत आहेत.