श्रीवर्धन आगाराचा गलथान कारभार

स्लीपर कोच बसची दयनीय अवस्था

। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।

प्रवाशांच्या सुरक्षिततेचा दावा करणाऱ्या एसटी महामंडळाचा गलथान कारभार श्रीवर्धन आगाराच्या स्लीपर कोच बसच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आला आहे. श्रीवर्धन आगाराच्या एमएच 09 एफएल 0339 या स्लीपर कोच बसमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असून, चक्क जुगाड करून ही बस रस्त्यावर धावत असल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या बसच्या खिडकीची काच निघाल्याने त्या जागी काच बसवण्याऐवजी प्लायवूडचा तुकडा लावण्यात आला आहे. तसेच, बसच्या आतील भागात खाली पत्र्याच्या जागीही प्लायवूडचा तुकडा ठोकण्यात आला आहे. हा प्लायवूडचा तुकडा नीट न बसवल्यामुळे ये-जा करणाऱ्या प्रवाशांना त्याची सतत ठेच लागत असून लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक जखमी होण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच, वरच्या बर्थवर चढण्यासाठी असलेली शिडीदेखील तुटलेल्या अवस्थेत असल्याने प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे.

लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी जादा दर आकारूनही अशा प्रकारची असुरक्षित आणि दुरवस्था झालेली बस प्रवाशांच्या माथी मारली जात आहे. श्रीवर्धन आगार प्रशासनाने या प्रकाराची तात्काळ दखल घेऊन बसची योग्य दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून होत आहे.

चार महिन्यांपूर्वीही नालासोपारा-श्रीवर्धन बसच्या खिडकीच्या काचा फुटून पावसाचे पाणी आत येत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली होती. त्यावेळी मनसेच्या नालासोपारा टीमने श्रीवर्धन आगारात तक्रार केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बस दुरुस्त करण्यात आली. गाड्यांची झालेली ही दुरवस्था दरवेळी प्रवाशांनीच प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यायची असेल, तर आगारातील कर्मचारी नेमके काय करतात, असा सवाल उपस्थित होत आहे.

– योगेश बोर्ले

Exit mobile version