श्रीवर्धन पालिकेचा ‌‘लाईव्ह प्रक्षेपण’ प्रस्ताव अखेर अजेंड्यावर

पत्रकारांच्या पाठपुराव्याला यश

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

श्रीवर्धन नगरपालिकेच्या सभागृहाचे कामकाज ‌‘लाईव्ह प्रक्षेपण’ करण्याच्या मागणीला अखेर यश आले असून, पत्रकारांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि नागरिकांच्या तीव्र रेट्यामुळे प्रशासनाने माघार घेतली आहे. यानुसार, 24 मार्च रोजी नियोजित सर्वसाधारण सभा रद्द करून आता 25 मार्च रोजी नव्या अजेंड्यासह जनरल बॉडी सभा आयोजित करण्यात आली आहे.

महत्त्वाचे म्हणजे, सुधारित अजेंड्यामध्ये “नगरपालिका जनरल बॉडी सभेचे कामकाज कॅमेराद्वारे थेट प्रक्षेपित करणे” हा विषय अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर तात्पुरता पडदा पडण्याची चिन्हे दिसत आहेत. यापूर्वी हा प्रस्ताव अजेंड्यावरून वगळण्यात आल्याने शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी प्रशासनावर जोरदार टीका केली होती, तर नागरिकांनीही या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली होती. पत्रकारांनीही या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत मुद्दा उचलून धरल्याने अखेर प्रशासनाला आपली भूमिका बदलावी लागली.

दरम्यान, या घडामोडींनंतर शिवसेना गटनेते देवेंद्र भुसाणे यांनी पत्रकार आणि श्रीवर्धनकर नागरिकांचे आभार मानले आहेत. त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “हा जनतेच्या एकजुटीचा आणि निर्भीड पत्रकारितेचा विजय आहे. नागरिकांनी आणि पत्रकारांनी आवाज उठवला नसता, तर हा महत्त्वाचा निर्णय शक्य झाला नसता.”

आता 25 मार्च रोजी होणाऱ्या सभेत हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर होतो का आणि त्याची अंमलबजावणी किती लवकर केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहरातील नागरिकांनीही आशा व्यक्त केली आहे की, “ईश्वरकृपेने सर्वांना सुबुद्धी होऊन हा ठराव मंजूर होईल आणि लवकरात लवकर प्रत्यक्षात उतरेल.”
एकूणच, श्रीवर्धनमध्ये पारदर्शकतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले जाण्याची चिन्हे दिसत असून, यामुळे स्थानिक प्रशासन अधिक जबाबदार आणि उत्तरदायी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version