| श्रीवर्धन | वार्ताहर |
पेशवेकालीन गाव, प्राचीन मंदिरे आणि तीन किलोमीटर लांबीचा निसर्गरम्य समुद्रकिनारा लाभलेल्या श्रीवर्धन येथे पर्यटकांची रेलचेल पाहायला मिळाली. शनिवार-रविवार आणि मे महिना अखेरीस सुट्ट्यांच्या निमित्ताने पर्यटकांनी हजेरी लावल्याने श्रीवर्धन हाऊसफुल्ल झाल्याचे दिसून येते.
श्रीवर्धनचा विस्तीर्ण आणि स्वच्छ समुद्रकिनारा पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरत आहे. समुद्रात पोहण्याचा आनंद घेण्याबरोबरच वाळूत किल्ले बनवणे याशिवाय घोडागाडी , उंट सफारीचा आनंद घेताना पर्यटक दिसले. श्रीवर्धनमधील रिसॉर्ट्स आणि होमस्टेंचे अनेक पर्यटकांनी आठवडाभर आधीच बुकिंग केल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. पर्यटकांकडून उकडीचे मोदक, सोलकढी, फणसाची भाजी या शाकाहारी पदार्थांना तर पापलेट, सुरमई, कोळंबी या सी फूड्सना विषेश मागणी असल्याचे हॉटेल चालकांनी सांगितले.
आंबा, फणस, जांभूळ, करवंदे या कोकणी मेव्याला पर्यटकांची पसंती असल्याचे दिसून आले त्याचप्रमाणे गृहउद्योगांना मोठी चालना मिळत आहे. घरगुती आंबा पोळी, फणस पोळी, कोकम सरबत, आवळा सरबत आणि औषधी आमसुलं यांना पर्यटकांकडून मागणी आहे. या गृह उद्योंगामुळे महिलावर्गाला आर्थिक हातभार लागतो आहे.
मे महिना अखेरीस पर्यटकांचा प्रतिसाद चांगला मिळाला. श्रीवर्धन येथील जवळपास सर्व खोल्या आरक्षित होत्या आणि रेस्टॉरंटमध्येही मोठी गर्दी बघायला मिळाली.
गणेश पोलेकर.
रिसॉर्ट चालक, श्रीवर्धन.







