करंजा बंदरात गाळाची समस्या

| चिरनेर | प्रतिनिधी |

मासेमारी हंगामात सुमारे 500 कोटींची मासळीची निर्यात करणारे अद्यावत करंजा मच्छिमार बंदर आता मोठ्या प्रमाणावर साचलेल्या गाळाच्या समस्येमुळे आणखीनच अडचणीत आले आहे.

15 ऑगस्टपर्यंत गाळाची समस्या कायमची सोडविण्यात आली नाही तर सुरू होणाऱ्या मासेमारी हंगामच धोक्यात येणार आहे. यामुळे मच्छिमारांवर उपासमारीचे संकट येऊन ठेपणार असल्याची भीती मच्छिमारांकडून व्यक्त केली जात आहे.

येत्या 15 ऑगस्टपासून मासेमारीचा हंगामाला सुरुवात होणार आहे.पावसाळी मासेमारी बंदी नंतर तब्बल 76 दिवसांनी मच्छिमार बोटी मासेमारीसाठी खोल समुद्रात रवाना होणार आहेत.यासाठी रायगड जिल्ह्यातील 1000 बोटी क्षमतेचे अत्याधुनिक करंजा मच्छिमार बंदरही सज्ज होण्याच्या तयारीत आहे. मात्र, रायगड जिल्ह्यातील हजारो मच्छिमारांसाठी वरदान ठरु राहाणारे 256 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले करंजा मच्छिमार बंदर मागील वर्षभरापासून गाळाने भरण्यास सुरुवात झाली आहे. गाळाच्या समस्येमुळे हजारो मच्छिमारांना ओहोटीच्या वेळी बंदरात मासळी उतरविण्यासाठी येणाऱ्या मच्छिमारांना आणि बंदरातुन मासळी उतरवून पुन्हा बाहेर जाण्यासाठी बंदरात बाहेरच चार-चार तास समुद्रातच वाट पाहावी लागते. यामुळे बंदरात आणि बंदराबाहेर शेकडो बोटी गाळात अडकून पडतात.

करंजा मच्छिमार बंदरातील गाळ काढणे व इतर काही पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 183 कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.मात्र तीन वर्षांत अद्यापही निधीचा ठावठिकाणा नाही. कामासाठी वेळेत निधी उपलब्ध होऊ शकलेला नाही.यामुळे बंदरातील गाळ व पायाभूत सोयीसुविधांचे काम रखडले आहे.मात्र यामुळे मात्र मच्छिमारांची गैरसोय होत आहे.

करंजा मच्छिमार बंदरातुन आता पावसाळी मासेमारी बंदीचा हंगाम वगळता सुमारे 500 कोटींची मासळी निर्यात होऊ लागली आहे.गाळाच्या आणि पायाभूत सुविधांच्या समस्येमुळे मासळी व्यावसायिक संकटात सापडले आहेत. लोकप्रतिनिधी व शासनाकडून पोकळ आश्वासनांखेरीज काहीही हाती लागत नसल्याने मच्छिमारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

शासनावर अवलंबून न राहता काही समस्या सोडवण्यासाठी मच्छिमार बोटींकडून प्रत्येक ट्रीपमागे एक हजार रुपये तर सप्लायर्सकडून वर्षाकाठी 30 हजार रुपये वर्गणी गोळा केली जात आहे. या वर्गणीतुनच आतापर्यंत बंदरात दोन कोटी खर्चाची आवश्यकतेनुसार कामे करण्यात आली असल्याची माहिती वेस्ट कोस्ट पर्ससीन नेट फिशरमेन वेल्फेअर असोसिएशनचे संचालक रमेश नाखवा यांनी दिली.
आता तर गाळाची समस्या कायम असल्याने मच्छीमार बोटी बंदरात येण्याचा कालावधी 6-8 तासांपर्यंत अधिक वाढणार असल्याने मासळी व्यावसायिकांवर विपरीत परिणाम होणार आहे.त्यामुळे मच्छीमारांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे, अशी भीतीही व्यावसायिक रमेश नाखवा यांनी व्यक्त केली आहे.

करंजा बंदरातील गाळाची समस्या मासेमारी हंगाम सुरू होण्यापूर्वीच सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. आवश्यक पायाभूत सुविधांच्या समस्यांही दूर करण्यासाठी पाठपुरावा केला जात असल्याचा दावा मत्स्यव्यवसाय विभागाचे उपायुक्त राजु भदूले यांनी माहिती देताना व्यक्त केला आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या हलगर्जीपणाचा फटका मच्छिमारांना बसत असल्याने मच्छिमारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Exit mobile version