रौप्य पदक जिंकणारी खेळाडू रेस्तराँमध्ये करतेय काम?

। पॅरिस । वृत्तसंस्था ।

सोशल मीडियावर सध्या एका तरुणीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात एक तरुणी रेस्तराँमध्ये ग्राहकांना खाद्यपदार्थ सर्व्ह करताना दिसत आहे. आता तुम्ही म्हणाल यात काय एवढं. पण या व्हिडिओत दिसणारी तरुणी दुसरी तिसरी कोणी नसून ती पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील चिनची रौप्य पदक विजेती खेळाडू झाऊ याकिन आहे.

जगातील मानाची स्पर्धा समजली जाणार्‍या ऑलिम्पिकमध्ये लक्षवेधी कामगिरी करणारे खेळाडू सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दैदिप्यमान कामगिरी करणार्‍या अनेक खेळाडूंवर बक्षीसाच्या रुपात पैशाची बरसात झाल्याचा मुद्दाही गाजतोय. त्यात आता नव्या व्हिडिओची भर पडली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिमनॅस्टीकचं मैदान मारणारी छोरी रेस्तराँमध्ये कामाला लागली आहे. ही खेळाडू पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वाधिक पदकं मिळवण्याच्या शर्यतीत दुसर्‍या स्थानावर असणार्‍या चीन या देशातील आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणार्‍या या तरुणीचं नाव झाऊ याकिन असं आहे. ती एक जिमनॅस्टीक खेळाडू आहे. चीनकडून तिने पॅरिसमध्ये रंगलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली होती. पदक जिंकल्यावर घरी परतल्यानंतर ती फॅमिली रेस्तराँमध्ये काम करताना स्पॉट झाली. रेस्तराँमध्ये ती आपल्या पालकांना हातभार लावत आहे. हे रेस्तराँ चीनच्या हुनान प्रांतातील हेंगयांग या शहरात असल्याचे बोलले जाते.
तिचा हा अंदाज चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय. चीनच्या 18 वर्षीय जिमनॅस्टिकनं महिला गटातील बॅलन्स बीम प्रकारात रौप्य पदक पटकावले होते.

Exit mobile version