संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजन
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
बांग्लादेशमध्ये गेल्या काही दिवसात अस्थिरतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. शेख हसिना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर तिथे सध्या नवे सरकार स्थापन झाले आहे. पण असे असले तरी तिथे अनिश्चिततेचे वातावरण कायम आहे. या सर्व प्रकरणानंतर आगामी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान होणार्या या स्पर्धेचे आयोजक बांगलादेश क्रिकेट बोर्ड आहे. मात्र, गेल्या काही दिवसातील स्थिती पाहता आता ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार आहे. याबाबत आयसीसीने पुष्टी केली आहे.
मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची बैठक ऑनलाईन पार पडली. जे अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते, त्यांच्यामते सध्याच्या अस्थिर परिस्थितीत स्पर्धा होऊ शकत नाही. तसेच, बांगलादेश क्रिकेट बोर्डही ही स्पर्धा हलवण्यास तयार आहे. तथापि, जरी ही स्पर्धा हलवली, तरी आयोजक म्हणून हक्क बांगलादेशकडे कायम राहतील. या स्पर्धेसाठी 26 ऑगस्टपासूनच सराव सामने होणार आहेत. तसेच, या स्पर्धेतील स्पर्धा दुबई आणि शारजाह या दोन शहरात होतील. या स्पर्धेत 16 संघ सहभागी होणार आहेत.
दरम्यान, आयसीसीने या स्पर्धेच्या आयोजनासाठी भारताचाही पर्याय म्हणून विचार केला होता. मात्र, बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी स्पष्ट नकार कळवला आहे. भारतात पावसाळा सुरू आहे आणि पुढील वर्षी भारतात महिलांची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा नियोजित आहे. यामुळे पाठोपाठ दोन विश्वचषक स्पर्धा भारतात खेळवणे योग्य ठरणार नाही, असे जय शहा यांनी कळवले आहे.
‘बांगलादेशमध्ये विश्वचषक नकोच’
ऑस्ट्रेलिया महिला संघाची कर्णधार एलिसा हेली हिने देखील बांगलादेशमध्ये सध्या टी-20 विश्वचषक खेळवणे चुकीचे वाटत असल्याचे म्हटले होते. तणावाखालून जात असलेल्या बांगलादेशमध्ये खेळणे मला कठीण जाईल. एक माणूस म्हणून तेथे खेळणे योग्य ठरणार नाही. नागरिकांचे जीव जात असताना आपण खेळत राहणे मनाला पटत नाही. सर्वप्रथम त्यांच्या देशाची गाडी रुळावर येणे महत्त्वाचे आहे, असे मत हिलीने व्यक्त केले होते.