रोहयाच्या वनश्री शेडगेने लक्ष वेधले
म्युझियम प्रशासनाने घेतली गंभीर दखल
| अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रोहा येथिल वनश्री शेडगे ही मुलगी उच्चशिक्षणासाठी सद्या लंडनमध्ये आहे, तेथील म्युझियममध्ये छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख पाहताच वनश्रीने क याविषयी लेखीपत्र मेलद्वारे पाठवित लक्ष वेधले, म्युझियम प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली असून त्यांनी तसे वनश्रीला कळविले आहे.
विजेसारखा तलवार चालवून गेला..
निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला..
अशा शब्दांत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बहाद्दरीचे वर्णन करण्यात आले आहे. शत्रूला नामोहरम करणारी भवानी तलवार तसेच ढाल, चिलखत आणि कट्यार, वाघनखे हा सारा मौल्यवान शिवकालीन ऐतिहासिक खजिना लंडनच्या म्युझियममध्ये आहे. पण याच म्युझियममध्ये छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याची धक्कादायक बाब रोह्याची मराठमोळी रणरागिणी वनश्रीच्या लक्षात आली. तिने याला आक्षेप घेतला. लेखी तक्रार करताच म्युझियमच्या प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली असून शिवरायांचा उल्लेख एकेरी न करता छत्रपती शिवाजी महाराज असा करणार असल्याचा मेल त्यांनी वनश्रीला पाठवला आहे. लंडनच्या म्युझियम प्रशासनाचे लक्ष वेधणार्या वनश्रीचे तमाम शिवभक्तांनी अभिनंदन केले आहे.
लंडनमधील म्युझियमला हिंदुस्थानबरोबरच जगभरातील अनेकजण भेट देत असतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील अनेक मौल्यवान वस्तू व साधने या म्युझियममध्ये जतन करण्यात आली आहेत. त्यात भवानी तलवारीचादेखील समावेश असून ज्या अफझलखानाचा कोथळा वाघनखाच्या सहाय्याने काढण्यात आला ती वाघनखेदेखील याच म्युझियममध्ये जतन करून ठेवली आहेत. महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक वारसा तसेच खजिना पाहण्यासाठी वनश्री ही म्युझियमला गेली होती.
ती लंडनमध्येच सिव्हिल इंजीनियरिंगचे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. म्युझियममधील अनेक दुर्मिळ वस्तू पाहात असतानाच एशिअन विभागाकडे तिचे लक्ष गेले. या विभागात महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील तलवारी, चिलखते, कट्यारी आढळून आल्या. वनश्रीची नजर शिवरायांच्या भवानी तलवारीकडे गेली. ही तलवार पाहताच तिने उत्स्फूर्तपणे शिवरायांचा जयजयकार केला. म्युझियममधील 12 नंबरवर भवानी तलवार तर 22 नंबरच्या रॅकमध्ये वाघनखे ठेवण्यात आली होती. मात्र त्यावरील लेबलवर शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याचे बघून वनश्रीने त्याबाबत म्युझियम प्रशासनाचे लक्ष वेधत लेखी तक्रार नोंदविली.
हा तर हिंदुस्थानचा अपमान –
छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचे बघून वनश्रीने लंडनच्या म्युझियम आयोजकांना खडेबोल सुनावले.. तसेच तिने म्युझियमच्या कॉमेंट कार्डमध्ये याबाबतची लेखी तक्रार केली. त्यात तिने ङ्गराजांचा एकेरी उल्लेख हा त्यांचा आणि माझ्या हिंदुस्थानचा अनादर आहे. केवळ महाराष्ट्र किंवा हिंदुस्थानातच नव्हे तर संपूर्ण जगभरात शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. शिवाजी महाराजांसम कोणीही नाहीफ असे स्पष्टपणे सुनावले. या तक्रारीनंतर म्युझियमच्या व्यवस्थापनाने वनश्रीशी ईमेलद्वारे संपर्क साधला असून लवकरच एकेरी उल्लेख काढून छत्रपती शिवाजी महाराज असे लिहिणार असल्याचे कळवले आहे. वनश्रीने केलेल्या या अनोख्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.