बहिणीने आपलं यकृत केलं दान
| पनवेल | वार्ताहर |
रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या अतूट नात्याचा दिवस. भाऊ बहिणीला वचन देतो, तर बहीण भावाच्या आयुष्यासाठी प्रार्थना करते. या रक्षाबंधनाच्या निमित्त पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथील बहिणीने आपल्या भावाला आयुष्याची भेट दिली आहे. या बहिणीने आपल्या भावाला यकृत दान करुन पुनर्जन्म दिला आहे.
पुणे पिंपरी चिंचवड येथील एका 21 वर्षीय बहिणीने ऑटोइम्यून लिव्हर सिरोसिस या आजाराशी लढा देत असलेल्या आपल्या 17 वर्षीय भावासाठी यकृत दान करून रक्षाबंधनची अनोखी भेट दिली. डॉ. विक्रम राऊत, संचालक, यकृत प्रत्यारोपण आणि एचपीबी शस्त्रक्रिया, मेडिकवर हॉस्पिटल्स, नवी मुंबई यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या टीमने ही यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडली.
रुग्णाचे वडिल संतोष पाटील हे एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात, तर त्यांची आई घरकाम आहे. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आणि आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देण्याकरिता ते पुण्यात आले. या जोडप्याला दोन मुले आहेत. त्यापैकी नंदिनी ही त्यांची मोठी मुलगी जी सध्या महाविद्यालयात शिकत आहे, तर राहुल हा त्यांचा धाकटा मुलगा आहे जो आता दहावीला आहे. राहुलला अचानक अशक्तपणा जाणवू लागला आणि रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या, तेव्हा हे संपुर्ण कुटुंब घाबरले. त्यांनी स्थानिक डॉक्टरांकडे धाव घेतली, पण त्याने फारसा फरक पडला नाही. अखेर ते नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटल्समध्ये पुढील उपचाराकरिता दाखल झाले. तेव्हा असे आढळले की राहुलला ऑटोइम्यून लिव्हर सिरोसिस आहे आणि यकृत प्रत्यारोपणाची नितांत गरज आहे.
मेडिकरवर हॉस्पिटलचे यकृत प्रतयारोप आणि एचपीबी शस्त्रक्रिया संचालक डॉ. विक्रम राऊत यांनी सांगितले की, ऑटोइम्यून यकृत रोग क्वचितच लहान मुलांवर परिणाम करतात आणि ते वयाच्या 2 वर्षांपर्यंत दिसून येतात. ऑटोइम्यून यकृत रोगात, रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती त्याच्या स्वतःच्या यकृत पेशींच्या विरूद्ध कार्य करण्यास सुरवात करते. जर लवकर निदान झाले तर औषधांनी उपचार केले जाऊ शकतात परंतु राहुलच्या बाबतीत उशीरा निदान झाले आणि त्याला वारंवार रक्तस्त्राव, जलोदर (ओटीपोटात द्रव जमा होणे) आणि कावीळ यासारख्या गुंतागुंत होत्या. त्यामुळे त्यांना यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात आला. डॉ. राऊत पुढे सांगतात की, रुग्णाच्या बहिणीने आजारी भावाचा जीव वाचवण्यासाठी कसलाही विचार न करता तिचे यकृत दान केले. आम्ही तिच्या यकृताचा आकार आणि यकृताची गुणवत्ता तपासली जी राहुलच्या यकृताशी पूर्णपणे जुळत होती. वेळीच उपचार न केल्यास रुग्णाला जीव गमवावा लागला असता. हे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम नव्हते मात्र त्यासाठी प्रत्यारोपण न थांबविता मेडिकवर हॉस्पिटल आणि इतर सेवाभावी संस्थांनी मदत केली.
माझा भाऊ हाच माझ्यासाठी संपूर्ण जग आहे. रक्षाबंधनाला मी त्याला एक मौल्यवान भेट दिली याचा मला खूप अभिमान वाटतो आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून आम्ही त्याच्या प्रकृतीबद्दल अत्यंत चिंतेत होतो. मात्र आता माझ्या भावाला नवे आयुष्य मिळाले असून, आम्ही सर्वच खूप खुश आहोत.
नंदिनी पाटील, रुग्णाची बहीण
माझ्या बहिणीने मला रक्षाबंधनाची अनोखी भेट दिली. माझी बहीणच माझा कणा आहे आणि तिने केलेल्या अमूल्य दानाबाबत मी आयुष्यभर ऋणी राहीन. तिच्यामुळेच आज मला नवे आयुष्य मिळाले आहे.
राहुल पाटील, रुग्ण